Advertisement

इस्माईल युसूफ महाविद्यालयात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह


इस्माईल युसूफ महाविद्यालयात मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह
SHARES

जोगेश्‍वरी पूर्वेकडील इस्माईल युसूफ महाविद्यालयात लवकरच मुलींसाठी वसतिगृह, वाणिज्य शाखेसाठी स्वतंत्र इमारत तसेच वाचनालय उभारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक निधीला प्रशासकीय मंजुरीही मिळाली आहे. गुरुवारी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र
वायकर यांच्या अध्यक्षतेखाली इस्माईल युसूफ महाविद्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या महाविद्यालयाला नुकताच नॅकचा ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे.

महाविद्यालयात 34 कामे प्रगतीपथावर -
वायकर यांचा आमदार निधी तसेच जिल्हा नियोजन निधीतून या महाविद्यालयाच्या विकासाची सुमारे 34 कामे प्रगतीपथावर आहेत. यासाठी तब्बल रुपये 10 कोटी खर्च करण्यात येत आहे. यात सभा मंडप, मुलांच्या हॉस्टेलच्या दुरुस्तीचे काम, खाणावळ, लाईटची व्यवस्था, मुलींची कॉमन खोली, जॉगिंग ट्रॅक, फेन्सींग, स्पोर्टस् ग्राऊंड आदी कामांचा समावेश आहे. या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज इस्माईल युसूफ महाविद्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्या परदेशी, कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्वाती व्हावळ आदी अधिकारी उपस्थित होते.

वसतिगृहात 320 मुलींच्या राहण्याची व्यवस्था -
या बैठकीत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. मुलांच्या वसतिगृहाच्या दुरुस्तीचे काम सुट्टीच्या कालावधीत त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिल्या. महाविद्यालयात लवकरच 320 मुलींच्या राहण्याची क्षमता असणारे वसतिगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे रुपये 32 कोटी 67 लाख 28 हजार 900 रुपयांचा निधीही मंजूर केला आहे. त्याचबरोबर 2017 -18 या आर्थिक वर्षात इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या विकासासाठी सुमारे 8 कोटी 91 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची अधिक पसंती असल्याने महाविद्यालयात वाणिज्य शाखेची 5 मजल्यांची स्वंतत्र इमारत तसेच वाचनालय उभारण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्वाती व्हावळ यांनी दिली. या दोन्ही इमारतीचे आराखडे तात्काळ तयार करण्याचे आदेश वायकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना दिले.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा