Advertisement

शाळकरी मुलांचा उद्योगशील प्रयोग


शाळकरी मुलांचा उद्योगशील प्रयोग
SHARES

गोरेगाव - शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि व्यावसायिक गुणांचा विकास व्हावा, यासाठी अंधेरी पूर्व येथील गोविंद बालमंदिर विद्यालयाच्या 5 वी ते 9 वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 1 हजार कागदी फुलांचं प्रदर्शन गुरुवारी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनांचे औचित्य साधून शाळेत आयोजित करण्यात आलं. हे प्रर्दशन दोन दिवस सर्वांसाठी खुले राहणार आहे.
प्रदर्शनात विविध प्रकारची कागदी फुले, व्यवसाय मार्गदर्शन माहितीपट, चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी केलेली वारली पेंटिंग आणि सर्जिकल स्ट्राईकवर काढण्यात आलेली चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. शाळेतील शिक्षिका सविता साबळे यांच्या प्रयत्नामुळे आणि मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास उपक्रमाद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणानंतर 5 वी ते 9वीच्या विद्यार्थ्यानी स्वत: पंतगाचा कागद, वर्तमानपत्र, क्रेप पेपर, झाडुच्या काड्या, विविध प्रकारचे पेपर, टी-शू पेपर या सर्व वस्तुंचा वापर करून फुले आणि पुष्पगुच्छ बनवले. विद्यार्थ्यांनी बनवलेली फुलं ही अत्यंत रेखीव आणि व्यवसायिक दर्जाची आहेत. पर्यावरणाची हानी होऊ न देता निसर्गाचा ऱ्हास थांबवून टाकाऊ वस्तुंपासून कशाप्रकारे त्याचा उपयोग करून पर्यावरण पूरक वस्तू बनवता येतील या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आला.
शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यामुळे भविष्यात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी हा उपक्रम राबवण्यात आल्याचं शाळेचे मुख्याध्यापक हणमंत सजगणे यांनी सांगितलं. शाळेच्या वतीने प्रदर्शनातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या वस्तु विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचं आवाहन शाळेचे कार्यवाहक दयानंद सावंत यांनी केलं.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा