Advertisement

महापुरूषांच्याही वरचढ 'मोदी भक्ती'चं बजेट, पुस्तक खरेदीसाठी ६० लाखांचा खर्च

समाजधुरीणांच्या विचारांनी प्रेरित होऊन नवी पिढी घडावी, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात म. फुले, गांधी, आंबेडकर या महापुरूषांच्या कार्यकतृत्वाचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येतात. या जोडीलाच विद्यार्थ्यांना आता 'मोदीभक्ती'चे धडे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या पुस्तकाचं बजेट या महापुरूषांच्या पुस्तकांपेक्षा जास्त असल्याने शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापुरूषांच्याही वरचढ 'मोदी भक्ती'चं बजेट, पुस्तक खरेदीसाठी ६० लाखांचा खर्च
SHARES

अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून ब्रिटीशांना पळता भुई थोडी करणारे म. गांधी, दिनदलित आणि स्त्रियांना शिक्षण तसंच समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी झटणारे म. ज्योतिबा फुले, 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा' असा नारा देत समाजातील पददलितांमध्ये नवनिर्मितीची ठिणगी पेटवणारे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर अशा समाजधुरीणांच्या विचारांनी प्रेरित होऊन नवी पिढी घडावी, या उद्देशाने शालेय अभ्यासक्रमात या महापुरूषांच्या कार्यकतृत्वाचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात येतात. या जोडीलाच विद्यार्थ्यांना आता 'मोदीभक्ती'चे धडे देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या पुस्तकाचं बजेट या महापुरूषांच्या पुस्तकांपेक्षा जास्त असल्याने शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञाकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.


काय आहे निर्णय?

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख व्हावी या उद्देशाने महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चरित्रात्मक पुस्तके खरेदी करून त्याचं विद्यार्थ्यांमध्ये वाटप केलं जातं. मात्र यावर्षी ६० लाख रूपये खर्च करून गुजराती, मराठी भाषेतील मोदींची चरित्रात्मक पुस्तके खरेदी करून त्यांचं वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे.



अवांतर वाचनासाठी...

विविध शाळांमध्ये पहिली ते ५ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महापुरूषांच्या कार्याची ओळख व्हावी यासाठी महात्मा फुले, महात्मा गांधी, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांची चरित्र पुस्तके दरवर्षी खरेदी केली जातात. ही पुस्तके त्या त्या शाळांच्या ग्रंथलयात पाठविली जातात. सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागावी म्हणून ही योजना शालेय शिक्षण विभागातर्फे राबविली जाते.


यंदा काय बदल?

मात्र यंदाच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील चरित्र पुस्तकांची खरेदी शिक्षण विभागाकडून करण्यात येत अाहे. या राष्ट्रीय महापुरूषांच्या पुस्तकांच्या तुलनेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकांची संख्या यांत अधिक असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.


महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग

भाजप नेते इतिहासाच्या पानातून बेफामपणे महापुरुषांची नावे पुसण्याचा उद्योग करत आहेत. त्यामुळे त्यांना मानसिक उपचारांची गरज आहे. इतिहासाची विटंबना करून थोर नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणं आणि शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करून स्वहितासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणं हा प्रकार घृणास्पद असून शालेय शिक्षण विभागाचा हा निर्णय म्हणजे 'विनोद'च आहे.
- अशोक चव्हाण, अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी


किती पुस्तकं?

पंतप्रधान मोदी आणि चाचा चौधरी यांची गुजराती भाषेतील ७२ हजार ९३३ पुस्तकं मागविण्यात येणार आहेत. तर हिंदी आणि इंग्रजी भाषेतील ७ हजार १४८ प्रती मागविण्यात येणार अाहेत. त्यासाठी ५९ लाख ४२ हजार रूपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचं शिक्षण विभागाने स्पष्ट केलं.

तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील मराठी भाषेतील ६९ हजार ४१६ पुस्तकांची ४५ रूपये या दराने पुस्तकांची खरेदी करण्यात येणार आहे. याशिवाय माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरील ७२ हजार पुस्तकांचीही याच दराने खरेदी करणार असल्याचं विभागाने स्पष्ट केलं.


फरक किती?

त्यातुलनेत डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ७८,३४८ पुस्तकांसाठी २४ लाख २८ हजार, मा. गांधी यांच्यावरील २ हजार ६७५ पुस्तकांसाठी ३ लाख २५ हजार आणि मा. फुले यांच्यावरील पुस्तकांसाठी २२ लाख ६३ हजार खर्च करण्यात येणार आहे. त्यानुसार ती तीन महापुरूषांवरील पुस्तकांसाठी एकत्रितरित्या ४९ लाख ९१ हजार रुपये खर्च करण्यात येणार असून हे बजेट एकट्या पंतप्रधान मोदी यांच्यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या (५९ लाख ४२ हजार रुपये) बजेटपेक्षा ९ लाख ५१ हजार रुपयांनी कमी आहे.


या पुस्तकांची निवड शिक्षण विभागाच्या तज्ज्ञ व्यक्तींकडून करण्यात आलेली आहे. केवळ मोदी हे पंतप्रधान आहेत म्हणून नव्हे, तर ही योजना विद्यार्थ्यंच्या हिताची आहे, म्हणून ही पुस्तकं विकत घेण्यात येत आहेत. यात कुणीही राजकारण आणू नये.
- सुनील मगर, संचालक, बालभारती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा