Advertisement

महाराष्ट्रात लवकरच स्थापन होणार 'क्लस्टर विद्यापीठ'


महाराष्ट्रात लवकरच स्थापन होणार 'क्लस्टर विद्यापीठ'
SHARES

महाराष्ट्रातील शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याच्या दृष्टीने राज्य सरकार लवकरच 'क्लस्टर विद्यापीठ' स्थापन करणार आहे. नुकताच महाराष्ट्रातील तीन क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव राज्य सरकारमार्फत राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान (रुसा) कडे पाठवण्यात आला असून यात विशेषत: मुंबईतील नावाजलेल्या महाविद्यालयांचा समावेश करण्यात आला आहे.


क्लस्टर विद्यापीठात या कॉलेजचा समावेश

एच. आर. महाविद्यालय, के. सी. महाविद्यालय, बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज (बीटीटीसी) या तीन महाविद्यालयांचे मिळून एक क्लस्टर विद्यापीठ, के. जे. सोमय्या कॉलेज या महाविद्यालयांचं दुसरं क्लस्टर विद्यापीठ, तसेच एल्फिस्टन कॉलेज, इन्स्टिट्युट ऑफ सायन्स, सिडनॅहम कॉलेज ऑफ कॉमर्स, शासकीय बीएड कॉलेज या महाविद्यालयांचं तिसरे क्लस्टर विदयापीठ तयार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.


क्लस्टर विद्यापीठ म्हणजे नेमक काय?

राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान (रुसा) हे उच्च शिक्षणाचा प्रसार आणि गुणवत्ता सुधारणेसाठी केंद्र शासनाने हे अभियान आखलं आहे. राज्यात २०१३ मध्ये हे अभियान स्वीकारण्यात आले. त्यानंतर रुसा अंतर्गत असलेल्या विविध योजना राज्यात राबवण्यात येत आहेत. त्यातील क्लस्टर विद्यापीठे ही त्यामधील एक योजना आहे.

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांपैकी काही नावाजलेल्या आणि शैक्षणिकरित्या दर्जेदार कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना एकत्र करून त्यांचं एक वेगळं विद्यापीठ स्थापन करण्यात येईल. तसेच त्या महाविद्यालयांच्या गटांना काही प्रमाणात शैक्षणिक स्वायत्तता आणि आर्थिक पाठबळ देण्यात येते. त्याशिवाय या प्रत्येक गटासाठी ५५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येते.

क्लस्टर विद्यापीठामुळे महाविद्यालयांना मिळणारा निधी आणि मिळणारे स्वातंत्र्य यामुळे नवे अभ्यासक्रम तयार करणे, संशोधनासाठी प्रकल्पांवर एकत्रित काम करणे, वेगळ्या विषयांचे अभ्यासक्रम उपलब्ध करून देणं शक्य होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना अधिक विषयांचं पर्याय या योजनेतून मिळू शकणार आहेत.


रुसा कौन्सिलची बैठक पार

बुधवारी ९ एप्रिल रोजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय उच्चस्तरीय शिक्षा अभियान (रुसा)च्या महाराष्ट्र राज्य रुसा कौन्सिलची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत रुसाच्या राज्य प्रकल्प संचालक मीता राजीवलोचन यांच्यासह रुसा कौन्सिलचं सदस्य उपस्थित होते. या बैठकीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रुसाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय महाविद्यालयं आणि विद्यापीठ यांना अधिक बळकटी देण्यासाठी तसेच शैक्षणिक गुणवत्ता अधिक दर्जेदार करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं सांगितलं. दरम्यान या विद्यापीठांना आवश्यक शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी रुसा प्रयत्न करत आहे


यासाठी सहाय्यता कक्षाची निर्मिती

रुसाच्या या महत्त्वपूर्ण बैठकीत विद्यापीठाच्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली असून महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये संशोधन, नाविन्यपूर्ण आणि उच्च शिक्षणासाठी अनेक प्रस्ताव देण्यात आले आहेत, तसेच नॅक मूल्यांकनासाठी रुसांतर्गत सहाय्यता कक्षाची निर्मिती करण्याचा विचार मांडण्यात आला आहे. शिक्षकांच्या अधिक क्षमता विकासासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, असं रूसामार्फत सांगण्यात आलं आहे.

उपरोक्त तिन्ही क्लस्टर विद्यापीठांचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर येथे कार्यरत प्राध्यापकांचे अनुदान हे शासनामार्फतच सुरू राहणार असून या क्लस्टर विद्यापीठांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तेमध्ये अधिक सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना आपला अभ्यासक्रम निवडण्यासाठी अधिक उत्तम पर्याय उपलब्ध होऊन चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टिमचाही लाभ मिळेल.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा