Advertisement

शाळा मुजोरीचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?


शाळा मुजोरीचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न?
SHARES

विक्रोळी - कन्नमवारनगर - 2 मधील मनोहर कोतवाल ट्रस्ट संचलित माध्यमिक विद्यालय शाळेच्या मुजोरीप्रकरणी नुकतीच शिक्षण विभागाने सुनावणी घेतली. शाळेची फी भरली नाही म्हणून मुलांना जमिनीवर बसवण्यासह डांबून ठेवण्याचा गंभीर प्रताप करणाऱ्या शाळेविरोधात नियमानुसार कडक कारवाई होणे या सुनावणीदरम्यान अपेक्षित होते. मात्र शिक्षण विभागाने असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची काळजी घ्यावी अशी केवळ लेखी समज दिली. त्यामुळे पालकांमध्ये प्रचंड नाराजी असून शिक्षण विभाग हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करतेय का? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.

शाळेची फी न भरल्याप्रकरणी शाळा कशी मुजोरी करत विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे याचा पर्दाफाश 'मुंबई लाईव्ह'ने काही दिवसांपूर्वी केला होता. शाळेच्या या मुजोरीची दखल घेत शिक्षण विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही दिले होते. दरम्यान, पालिकेच्या उत्तर विभागाचे शिक्षण निरीक्षक अनिल साबळे यांनी शाळा व्यवस्थापन आणि पालकांची बाजू ऐकत सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यान शाळेने मुलांना जमिनीवर बसवण्यासह डांबून ठेवल्याचे कृत्य केल्याचे स्पष्टही झाले. त्यामुळे शाळेविरोधात कडक कारवाई करणे गरेजेचे होते. पण शिक्षण निरिक्षकांनी समज देत केवळ शाळेवर मेहरनजर दाखवली आहे. तर शाळेच्या फीबाबत बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. पालकांना सुधारित फी संचरना मान्य नसल्यास जुन्या दराने फी भरावी असे आदेशही दिले आहेत.

याबाबत 'मुंबई लाइव्ह'ने शिक्षण निरिक्षकांशी संपर्क साधला असता त्यांनी तूर्तास समज देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले आहे. तर कारवाईबाबत विचारले असता, चौकशी सुरू आहे, कारवाई होईल, असे म्हणत वेळ मारून नेली. पालकांनी मात्र शाळेविरोधात कारवाई झालीच पाहिजे, ही भूमिका उचलून धरली असून यासाठी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा चालूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा