Advertisement

टेकफेस्टनंतरही सुरू राहणार आयआयटीत सोलार चाय ठेला

हे पॅनल सौर ऊर्जा असताना त्यातून बॅटरी चार्ज करतील आणि त्याचा उपयोग चहा बनवण्यासाठी होईल. विशेष म्हणजे सुर्यास्तानंतरही चार्ज झालेल्या बॅटरीतून स्टोव्हला ऊर्जा प्राप्त होत राहणार असून जवळपास १००० कप चहा यावर बनवता येऊ शकतो.

टेकफेस्टनंतरही सुरू राहणार आयआयटीत सोलार चाय ठेला
SHARES

देशातील सर्वात मोठा तंत्रज्ञान उत्सव म्हणून ख्याती असलेल्या आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मध्ये  विज्ञान-तंत्रज्ञानाचे विविध आविष्कार पाहण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली. या फेस्टमध्ये अँड्रॉइड यू, फुटबॉल खेळणारा रॉबोट हिट ठरल्यानंतर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला पहिला सोलर चाय ठेला सुपरहिट ठरत आहे. 


असा आहे ठेला

सौरऊर्जेला प्रोत्साहन देणाऱ्या आयआयटी मुंबईच्या सोल्स कार्यक्रमातंर्गात हा चहाचा ठेला तयार करण्यात आला आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे चहा बनवण्यासाठी एलपीजी किंवा केरोसिनवर पेटणारा स्टोव्ह न ठेवता या ठिकाणी सोलार इंडक्शन कुक-स्टोव्ह ठेवण्यात आला आहे. या स्टोव्हला ऊर्जा पुरवण्यासाठी या चहाच्या गाडीला छप्पर म्हणून सोलार पॅनल्स बसवण्यात आले आहेत. 


१००० कप चहा

हे पॅनल सौर ऊर्जा असताना त्यातून बॅटरी चार्ज करतील आणि त्याचा उपयोग चहा बनवण्यासाठी होईल. विशेष म्हणजे सुर्यास्तानंतरही चार्ज झालेल्या बॅटरीतून स्टोव्हला ऊर्जा प्राप्त होत राहणार असून जवळपास १००० कप चहा यावर बनवता येऊ शकतो. इतकंच नव्हे तर या सोलार इंडक्शन कुक-स्टोव्हवर चार वेळेचं संपूर्ण जेवणही तयार करता येऊ शकतं. हा सोलार चहा ठेला टेकफेस्ट नंतरही आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये ठेवण्यात येणार अाहे. पवईत राहणाऱ्या पुष्पा भोईर ह्या ठेल्याचा सांभाळ करणार आहेत.


महिला सक्षमीकरण

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही कंदिलाच्या प्रकाशात अभ्यास आणि गृहिणींनी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. त्यांना होणारा त्रास लक्षात घेता विद्यार्थी आणि महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने आयआयटीच्या काही विद्यार्थ्यांनी सौरदिवे आणि इंडक्शन कूकर निर्मितीचे प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचा एक भाग म्हणजे हा सोलार चाय ठेला असून आयआयटीचे प्राध्यापक चेतन सोलंकी आणि जयंद्रन वेंकटेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तो बनवला आहे. हर्षद सुपल, प्रसाद सावंत, रघुवेंद्र नारायण, पवन वेंकटा, सतीश, विनय प्रतापसिंग, राकेश अहिरे या विद्यार्थ्यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली आहे. 


५० हातगाड्यांचं लक्ष्य

सौरऊर्जेच्या मदतीने तुम्ही पूर्ण स्वयंपाक बनवू शकता याबद्दल जनजागृती करण्यासाठी 'टेकफेस्ट'च्या निमित्तानं आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये चहाची हातगाडी लावण्यात आली अाहे.  या चहासाठी एक रूपयाही आकारण्यात येत नाही. विशेष म्हणजे चहा पिण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाला याबाबत संपूर्ण माहिती देण्यात येत असून अशाप्रकारे सौरऊर्जेवर चालणाऱ्या अशा ५० हातगाड्या मुंबईतही सुरू व्हाव्यात हा यामागे प्रमुख उद्देश आहे. हेही वाचा - 

आयआयटी टेकफेस्टमध्ये अँड्राॅइड-यू, फूटबाॅल खेळणारा रोबो हिट

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा