'परीक्षांचे निकाल लावा, अन्यथा आंदोलन करु'

 Mumbai
'परीक्षांचे निकाल लावा, अन्यथा आंदोलन करु'
Mumbai  -  

राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी ३१ जुलैपर्यंत मुंबई विद्यापीठाला सर्व निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले. मात्र राज्यपालांच्या तंबीनंतरही निकाल जाहीर होण्याची कोणतीच चिन्ह दिसत नाहीयेत. सध्याच्या स्थितीत १० दिवसांत लाखो पेपर तपासणे अश्यक्यच आहे. गेल्या दीड महिन्यात १७ लाख उत्तरपत्रिकांपैकी केवळ ९ लाख उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. मात्र निकाल वेळेवर लागणार नाहीत म्हटल्यावर सर्व विद्यार्थ्यी संघटना आक्रमक झाल्या आहेत.


युवा सेना

युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत कुलगुरूंना एक निवेदन दिलंय. जर ३१ जुलैपर्यंत सर्व परिक्षांचे निकाल लागले नाहीत, तर कुलगुरूंनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, नाहीतर युवा सेना तीव्र आंदोलन करेल, असा इशारा त्यांनी कुलगुरूंना दिलाय.


कुलगुरूंना राज्यपालांनी  ३१ जुलैपर्यंत सर्व परिक्षांचे  निकाल लावा, असे आदेश दिले आहेत. मात्र सध्या विदयापीठात सुरू असणाऱ्या गोंधळामुळे निकाल वेळेत लागतील असं वाटत नाही. त्यातच 'कुलसचिव' हे पद रिक्त झाल्यामुळे निकाल वेळेत लागणं कठीण आहे. त्यामुळे कुलगुरूंनी त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे.

प्रदीप सावंत, युवा सेना


विद्यार्थी संघटना - मनसे


३१ जुलैपर्यंत सर्व निकाल लागणे अपेक्षित आहे. राज्यपालांच्या आदेशांचे पालन करणे कुलगुरुंना अनिवार्य आहे. आता सरकारनेच निकालाच्या कामात लक्ष घालावे. सरकारचा आता कुलगुरुंच्या वागण्यावर कंट्रोल असणे गरजेचे आहे. जर निकाल वेळेत लागले नाहीत, तर त्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. ३१ जुलैपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लागले नाहीत, तर विद्यार्थी संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर कुलगुरुंना राजीनामा द्यावाच लागेल.

सुधाकर तांबोळी, विद्यार्थी संघटना, मनसे


समविचारी विद्यार्थी संघटना


कुलगुरुंनी निकालाबाबत सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती आम्हाला दिली. ऑनलाईन असेसमेंटचे भविष्यात काय फायदे होतील, या विषयीही सांगितले. मात्र ३१जुलैपर्यंत सर्व परिक्षांचे निकाल जाहीर न झाल्यास सम्यक विद्यार्थी आंदोलन, मुंबई व समविचारी विद्यार्थी संघटना यांच्यावतीने तीव्र निदर्शने करू असा इशारा आम्ही कुलगुरुंना दिला आहे. 

अक्षय गुजर, अध्यक्ष, सम्यक विद्यार्थी आंदोलन

दरम्यान, या सर्व प्रकरणावर युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही ट्विटरवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 


 
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Loading Comments