Advertisement

समायोजन झालं, वेतनाचं काय? शिक्षकांचा सवाल


समायोजन झालं, वेतनाचं काय? शिक्षकांचा सवाल
SHARES

मुंबईतील उत्तर विभागांतून पश्चिम विभागात समायोजन होऊन दोन महिने उलटले, तरी अतिरिक्त शिक्षकांचं वेतन काही सुरू होत नसल्याने शिक्षकांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे तातडीने वेतन सुरू करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.


शालार्थमध्ये अडचणी

याबाबत शिक्षक परिषदेने मुंबई शिक्षण उपसंचालक आणि संचालकांकडे तक्रार केली आहे. मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनासाठी ऑक्टोबर महिन्यात शिबीरं आयोजित करण्यात आली होती. या शिबिरात उत्तर विभागातून पश्चिम विभागात शिक्षकांच्या रिक्त जागी समायोजन करण्यात आलं. त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचं वेतन समायोजन झालेल्या शाळेमध्ये तयार करण्यात आलं. पण शालार्थ प्रणालीत अडचणी आल्यामुळे वेतन मिळण्यास उशीर होत असल्याचं कारण शिक्षण निरीक्षक पश्चिम कार्यालयाकडून देण्यात येत आहे.


शिक्षकांना भुर्दंड

शिक्षण निरीक्षक कार्यालयाने शिक्षकांचं वेतन सुरू होण्याबाबत आणि शालार्थ अडचणी दूर करण्याबाबत तातडीने पाठपुरावा करणं आवश्यक होतं. पण २ महिने उलटल्यानंतरही शिक्षकांच्या खात्यात वेतन जमा न झाल्याने त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. गृहकर्जाचे, विम्याचे हफ्ते वेळेवर न भरल्याने संबंधित कंपन्यांकडून शिक्षकांना दंड आकारला जात आहे.


शिक्षण निरीक्षक कार्यालयाने तातडीने कार्यवाही करून शिक्षकांचे वेतन सुरू करावे. वेतन नसल्याने शिक्षकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

अनिल बोरनारे, शिक्षक परिषद, मुंबई

संबंधित विषय
Advertisement