चौथीच्या पुस्तकातला चुकीचा इतिहास, म्हणे मालुसरेंचं टोपणनाव 'सिंह' होतं!

 Virar
चौथीच्या पुस्तकातला चुकीचा इतिहास, म्हणे मालुसरेंचं टोपणनाव 'सिंह' होतं!

मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात वेगवेगळ्या विषयांच्या पुस्तकांचा समावेश असतो. मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि त्यांना विविध विषयांचं ज्ञान व्हावं यासाठी ही पुस्तकं आणि त्यांचा अभ्यासक्रम काळजीपूर्वक निवडला जातो. मात्र याच पुस्तकांमध्ये अनेकदा चुकीची माहिती मुलांपर्यंत पोहोचवली जाते. असाच काहीसा प्रकार विरारच्या नॅशनल इंग्लिश हायस्कूलमध्ये समोर आला आहे. या शाळेत मुलांना दिलेल्या इतिहासाच्या पुस्तकात सिंहगडाचं नाव कशावरून पडलं याचा एक नवाच जावईशोध लावण्यात आला आहे.

विरारमधल्या नॅशनल इंग्लिश हायस्कूलनं इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांसाठी नवी दिल्लीतल्या न्यू सरस्वती हाऊस प्रा.लि. मधून इतिहासाची पुस्तकं मागवली होती. आयसीएसई बोर्डाची पुस्तकं मागवण्याचा अधिकार शाळेला आहे. त्यातल्या इतिहासाच्या पुस्तकात हा उल्लेख आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती तानाजी मालुसरे यांनी प्राणांची आहुती देऊन आधीचा कोंडाणा आणि आत्ताचा सिंहगड जिंकून घेतला. त्यांनी केलेल्या सिंहासारख्या पराक्रमामुळे या गडाला 'सिंहगड' असे नाव पडले असा इतिहास सर्वमान्य आहे. स्वत: शिवाजी महाराजांनीच तानाजी मालुसरेंच्या पराक्रमामुळे या गडाला सिंहगड नाव दिल्याचाही उल्लेख आहे. मात्र नॅशनल इंग्लिश हायस्कूलने मागवलेल्या या पुस्तकात मात्र वेगळाच इतिहास मुलांना शिकवला जात आहे. सिंहगड जिंकणाऱ्या तानाजी मालुसरेंचं टोपणनाव 'सिंह' असं होतं. म्हणूनच या गडाला 'सिंहगड' असं नाव देण्यात आल्याचा उल्लेख या पुस्तकातल्या सिंहगडासंबंधीच्या धड्यामध्ये करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिवसैनिकांनी शाळा प्रशासनाला चूक लक्षात आणून दिली. दरम्यान, शिवसेनेनं इशारा दिल्यानंतर शाळेनं चूक मान्य केली असून पुस्तकाच्या प्रती विद्यार्थ्यांकडून परत मागवल्या. शिवाय संबंधित मजकूरावर सुधारित मजकूर चिकटवून ती पुस्तकं पुन्हा विद्यार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading Comments