Advertisement

शेफ देवव्रत यांच्या मार्गारीन 'त्रिमूर्ती' शिल्पाची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद


शेफ देवव्रत यांच्या मार्गारीन 'त्रिमूर्ती' शिल्पाची 'गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद
SHARES

सांताक्रूझ येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतर्देशीय (डोमेस्टिक) विमानतळाच्या आवारात (अरायव्हल मध्ये) गेल्या महिन्याभरात पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या शेफ देवव्रत आनंद जातेगावकर यांच्या मार्गारीन 'त्रिमूर्ती' शिल्पाची दखल आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. हे शिल्प वातानुकुलीत काचेच्या केबिनमध्ये ठेवण्यात आले होते. २४ फेब्रुवारी २०१७ (महाशिवरात्री)ला पूर्ण होऊन सर्वांसाठी एक महिना प्रदर्शनास ठेवण्यात आले होते.

तब्बल १५०६.८०० किलो वजनाचे हे शिल्प साडे आठ फुट लांबीचे व साडे सहा फूट उंचीचे होते. अवघ्या १० दिवसात या भव्य शिल्पाचे काम शेफ देवव्रत जातेगावकर यांनी पूर्ण केले. त्यासाठी दिवसाचे १४ तास ते  कार्व्हिंग कलाकारीसाठी व्यस्त असायचे. या शिल्पाद्वारे भारतीय संस्कृतीची महती जागतिक पातळीवर आणखीन वाढवण्याचा मानस शेफ देवव्रत जातेगावकर यांचा आहे.

मार्गारीन (लोण्याचा पदार्थ) हा पदार्थ तेलापासून बनवतात. त्याचा मोठ्या प्रमाणात वापर बेकरी उत्पादनांमध्ये केला जातो. फळे, भाज्या, चॉकलेट तसेच मार्गारीन,कार्व्हिंगमध्ये शेफ देवव्रत यांनी कौशल्य विकसित करून ती आपली खासियत बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले असून, मार्गारीन शिल्पकलेत शेफ देवव्रत यांनी सुवर्णपदकदेखील पटकावले आहे. जर्मनीमध्ये २०१२ साली झालेल्या कलिनरी ऑलिम्पिकमध्ये शेफ देवव्रत यांच्या 'O सिंड्रेला' या मार्गारीनच्या शिल्पाने भारताला पहिलेवहिले रौप्यपदक मिळवून दिले होते. सत्तर देशातील जवळ १८०० शेफस् त्यात सहभागी झाले होते. सिंड्रेलाची संपूर्ण कथा महाला सकट दर्शविणारी कलाकृती देवव्रत यांनी मार्गारीनमध्ये साकारली होती.

'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये आपल्या कलेच्या माध्यमाने नाव नोंदवून या बहुगुणी अवलियाने भारताची कला महती आणखीन वाढवली आहे. या रेकॉर्ड संबंधी विचार व्यक्त करताना शेफ देवव्रत म्हणाले, 'हे शिल्प साकारणं गेल्या कित्येक वर्षांचं माझं स्वप्न होतं, माझे वडील आनंद विनायक जातेगावकर माझे स्फूर्तीस्थान आहेत. त्यांच्या प्रेरणेनेच मी हे काम सुरु केले होते. शिल्प करताना अनेक अडचणी आणि प्रसंग माझ्यासमोर आले. केबिनचे तापमान आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे सुरुवातीला मूर्तीला तीन वेळा मोठ्या तडे गेले होते. शिल्प पूर्ण झाल्यानंतरसुद्धा ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’कडून पाहणी करण्यात आली आणि शेवटी स्वप्न साकार झाले. माझ्यासोबत माझी शेफ मंडळींची टीम रात्रंदिवस काम करत होती'.

शेफ देवव्रत जातेगावकर दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमांतून लोकांच्या घराघरात पोहोचले आहेत. रेसिपी व्यतिरीक्त त्यांचा कार्व्हिंग हा पैलू विशेष लोकप्रिय आहे. या रेकॉर्डसंबंधी माहिती व फोटो www.devwratjategaonkar.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा