Advertisement

हसवता हसवता मर्मावर बोट ठेवणारा 'चि. व. चि. सौ. का'


हसवता हसवता मर्मावर बोट ठेवणारा 'चि. व. चि. सौ. का'
SHARES

हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी या गाजलेल्या चित्रपटांनंतर आता परेश मोकाशी यांचा 'चि. व चि. सौ. कां' हा सिनेमा प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे.

सत्या आणि सावित्री ही या सिनेमातली प्रमुख पात्र. सिनेमातला सत्या इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्याची स्वतःची सोलार कंपनी आहे. पाणी हा त्याचा अगदी जिव्हाळ्याचा विषय. 'पाणी वाचवा' हा संदेश सतत देत रहाणारा पर्यावरण प्रेमी. तर सावित्री प्राण्यांची डॉक्टर. त्यामुळे अगदी मुंगळ्यालाही जपणारी अशी प्राणी प्रेमी. हे दोघं म्हणजेच पाणी प्रेमी आणि प्राणी प्रेमी लग्नासाठी एकमेकांना भेटतात. नुकताच त्यांच्या जवळच्या मित्र-मैत्रिणीचा प्रेम विवाह खूप छोट्या कारणामुळे तुटलेला असतो. हे सर्व पाहूनच सावित्री सत्यासमोर 'लिव्ह इन'चा पर्याय ठेवते. तेव्हा एकत्र राहून जमलंच तर लग्न नाहीतर वेगळं असा तिचा निर्णय सत्या मान्य करतो आणि तिथून सुरु होते लग्न, लिव्ह इन रिलेशनशिप आणि प्रेम यांच्या भोवती फिरणारी गोष्ट.

चित्रपटाच्या सुरवातील उगाचच सगळे जण मोठमोठ्याने बोलतायत, अगदी छोट्या गोष्टी ही ओरडून सांगताना पाहायला मिळतात. म्हणजे अगदी 'हे एवढे का ओरडतायत?' असा प्रश्न पडतो. सिनेमा जसजसा पुढे सरकतो तसतसा जास्त मनोरंजक होऊ लागतो. मनोरंजक असला तरीही हसत हसत एका सामाजिक गोष्टीवर भाष्य करणारा हा सिनेमा आहे. आजकाल अगदी छोट्या छोटी गोष्टीवरून होणारे नवरा बायकोचे वाद आणि त्यातून सुटका म्हणून वाढत चाललेलं घटस्फोटांचं प्रमाण यावर हा सिनेमा भाष्य करतो. हा सामाजिक विषय गंभीर असला तरी सिनेमात अगदी कुठेही उगाच सिरिअस ट्रॅक न दाखवता विषय मांडला आहे. सिनेमाचे संवाद अगदी मजेशीर लिहिलेले आहेत. सत्या आणि सावित्री ह्या दोघांची कुटुंबंही अगदी मजेशीर दाखवण्यात आली आहेत. सत्या म्हणजेच ललित प्रभाकरला प्रेक्षकांनी 'जुळून येती रेशीम गाठी' मुळे प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आहे. पण त्या मालिकेतील शांत-अबोल भूमिका आणि या सिनेमातली भूमिका अगदी विरुद्ध आहेत. आणि त्याने ती चोख निभावलीये. सावित्री म्हणजे मृण्मयी गोडबोले हिनेसुद्धा तिच्या भूमिकेला न्याय दिला आहे.

सत्याच्या आई-वडिलांच्या भूमिकेत दिसणारे सुप्रिया पाठारे - प्रदीप जोशी आणि सावित्रीच्या आई-वडिल आणि बहिणीच्या भूमिकेत दिसणारे पौर्णिमा तळवलकर - सुनील अभ्यंकर आणि शर्मिष्ठा राऊत या प्रत्येकाने त्यांच्या भूमिकेला न्याय दिला आहे. सत्याच्या आजीच्या भूमिकेत दिसणाऱ्या ज्योती सुभाष आणि सावित्रीच्या भावाच्या भूमिकेत दिसणारा पुष्कर लोणारकर फार कमी संवाद असूनही लक्ष वेधून घेतात. भारत गणेशपुरे सिनेमात सूत्रधाराच्या भूमिकेत अधूम मधून तुमचं मनोरंजन करताना दिसतात. त्यामुळे स्टारकास्ट पासून ते सामाजिक विषय खूप उत्तम पद्धतीने मांडण्यापर्यंत सगळंच सिनेमात मस्त जुळून आलं आहे. संपूर्ण कुटुंबाने एकत्र पहावा असा हा सिनेमा आहे. तेव्हा २ तास खळखळून हसण्यासाठी एकदा तरी हा सिनेमा नक्कीच पहाता येईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा