‘दंगल’ म्हणजे आमिरची अविस्मरणीय ख्रिसमस गिफ्ट


  • ‘दंगल’ म्हणजे आमिरची अविस्मरणीय ख्रिसमस गिफ्ट
  • ‘दंगल’ म्हणजे आमिरची अविस्मरणीय ख्रिसमस गिफ्ट
  • ‘दंगल’ म्हणजे आमिरची अविस्मरणीय ख्रिसमस गिफ्ट
SHARE

सलमान खानच्या ‘सुलतान’नं दणदणीत यश मिळवलं तेव्हा आमिर खानच्या ‘दंगल’चं काय होणार, अशी शंका अनेकांच्या मनात आली होती. त्यामागचं कारण म्हणजे या दोन्ही चित्रपटांचा सारखा असलेला कुस्ती हा विषय. एकाच विषयावर आधारलेली पहिली कलाकृती सुपरहिट ठरल्यानंतर दुसऱ्या कलाकृतीबद्दल अशाप्रकारची शंका निर्माण होणं साहजिकही होतं. परंतु, ‘दंगल’ पाहिल्यानंतर या सर्व शंका फोल ठरतात. ‘सुलतान’ ही निव्वळ काल्पनिक कथा होती आणि त्याला प्रेमकथेचा भक्कम पाया होता. ‘दंगल’ हा वास्तवपट असून तो आपल्याला कुस्तीपटू महावीरसिंग फोगट यांच्या आयुष्यात डोकावण्याची संधी देतो. आपल्याकडून न घडलेला पराक्रम आपल्याच मुलींकडून करवून घेणाऱ्या वडील-मुलींमधील अनोख्या नात्याची ही रोमहर्षक गोष्ट आहे. लहान मुलींच्या जन्मापासून ते त्यांच्या पुढच्या सर्व प्रवासात त्यांना कमी लेखणाऱ्या समाजाच्या डोळ्यात अंजनही यात घातलं गेलंय आणि तेही कसलाही प्रचारकी थाट आणू न देता हे विशेष. लेखन, दिग्दर्शन, अभिनय, संगीत अशा सर्व आघाड्यांवर जमून आलेला हा चित्रपट या वर्षीच्या ख्रिसमसची विशेष भेट म्हणावा लागेल. ‘स्पोर्टस फिल्म्स’चा शेवट आधीच माहिती असल्यामुळे हा चित्रपट थोडा ‘प्रेडिक्टेबल’ झालाय खरा, तसेच अधूनमधून तो थोडा फार रेंगाळलायसुद्धा. मात्र या दोषांवर मात करणाऱ्या इतर अनेक गोष्टी यात आहेत आणि तिथंच ‘दंगल’नं बाजी मारली आहे.

महावीरसिंग फोगट (आमिर खान) यांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कुस्तीस्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकायचं स्वप्न असतं. परंतु, ते स्वतः हे स्वप्न काही पूर्ण करू शकत नाहीत. तेव्हा आपल्याला मुलगा होईल अशी आशा ठेवून ते त्याला चॅम्पियन बनवण्याचं दुसरं स्वप्न बघतात. मात्र एकापाठोपाठ मुली झाल्यानं त्यांचं हे स्वप्नही भंगतं आणि ते निराशेच्या गर्तेत स्वतःला झोकून देतात. मात्र एके दिवशी त्यांच्या दोन मुली गीता आणि बबिता यांच्याविरुद्ध एक तक्रार येते. या दोघींनी आपल्या शेजारी राहणाऱ्या मुलांना काही कारणास्तव बदडलेलं असतं. या मुलांची झालेली अवस्था पाहून फोगट यांना बरं वाटतं आणि आपली स्वप्नपूर्तीसाठी आणखी एक संधी मिळाल्याचा त्यांना आनंद होती. पत्नी आणि मुलींच्या इच्छेविरूद्ध ते त्यांना पैलवान करायचं ठरवतात. सुरुवातीला या दोन्ही आपल्या पित्याला विरोध करतात आणि मात्र कालांतरानं हा विरोध मावळतो आणि त्याही स्वतःला कुस्तीमध्ये झोकून देतात. या मुलींचं हे समर्पण महावीरसिंग यांची स्वप्नपूर्ती करण्यात यशस्वी ठरतं की आणखी इतरच काही घडतं हे पाहण्यासाठी चित्रपट पाहायला हवा.
कोणताही चित्रपट चांगला बनण्यासाठी मुळात त्याचं लेखन अव्वल दर्जाचं हवं. ‘दंगल’साठी स्वतः दिग्दर्शक नितेश तिवारी, पियुश गुप्ता, श्रेयस जैन आणि निखील मेहरोत्रा अशा चौघांनी कष्ट घेतलेत. कुस्तीसारख्या खेळावरचा चित्रपट गंभीर आणि अनाकर्षक बनण्याची मोठी भीती होती. ती दूर करत दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी संपूर्ण चित्रपट हलक्याफुलक्या प्रसंगांनी बांधला आहे. हेच या चित्रपटाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य मानावं लागेल. फोगट यांचं मुलींवर पैलवानकी लादणं आणि मुलींनी ती झुगारून देण्याचे प्रसंग खूप छान जमलेत. कुस्ती हाच चित्रपटाचा विषय असल्यानं चित्रपटभर कुस्तीची अनेक रोमहर्षक दृश्यं पाहायला मिळतात. मोठ्या मुलीची राष्ट्रीय स्तरावर निवड होते आणि तिला वेगळा प्रशिक्षक मिळाल्यानंतर चित्रपटात नाट्यमय वळण येते. इथून हा चित्रपट अधिक गतिमान झालाय. चित्रपटाचा शेवट ‘प्रेडिक्टेबल’ असला तरी तो खिळवून ठेवण्यात यशस्वी झाला आहे.
महावीरसिंग फोगट यांची व्यक्तिरेखा आमिर अक्षरशः जगला आहे. या व्यक्तिरेखेमधले सर्व भावतरंग त्यानं अतिशय नेमकेपणानं टिपले आहेत. त्याची देहबोली आणि संवादफेक बिनचूक म्हणावी लागेल. तरुणपणीचे महावीरसिंग शोभण्यासाठी आमिरनं केलेली शारीरिक मेहनत पडद्यावर साफ दिसते आणि व्यायाम सोडल्यानंतर बेढब शरीरामधील आमिरही तितकाच लक्षात राहतो. गेल्या दशकभरापासून प्रत्येक चित्रपटागणिक आपल्या अभिनयाच्या उंचीचा नवीन बेंचमार्क निर्माण करणाऱ्या आमिरच्या कारकीर्दीमधील ही व्यक्तिरेखासुद्धा चिरस्मरणीय ठरावी. ‘दंगल’मध्ये एकटा आमिरच अभिनयाच्या आघाडीवर आपली चमक दाखवत राहिला असता तर या चित्रपटाचा म्हणावा तसा परिणाम जाणवला नसता. ही बाब नेमकेपणानं हेरून दिग्दर्शकानं इतर सर्व पात्रांमधून अव्वल दर्जाचा अभिनय काढून घेतला आहे. आमिरच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या साक्षी तन्वर, मोठ्या मुली – फातिमा साना शेख आणि सन्या मल्होत्रा अत्यंत सहजतेनं वावरल्या आहेत. या मुलींच्या लहानपणीच्या व्यक्तिरेखा साकारणाऱ्या झारा वासीम आणि सुहान भटनागर यांनीही कमाल केली आहे. चित्रपटामध्ये विशेष लक्षवेधी ठरला आहे ती आमिरच्या नातलगाची भूमिका साकारणारा अपराशक्ती खुराना हा कलावंत. मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा गिरीश कुलकर्णी छोट्याशा भूमिकेवरही आपली छाप उमटवून गेला आहे. प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेली हानीकारक बापू, धक्कड आणि शीर्षक गीतं ऐकायला जेवढी छान आहेत, तेवढीच ती कथानकाशीही एकरूप झाली आहेत. बल्लू सलूजाचं संकलन कट टू असलं तरी त्याची कात्री आणखी धारदार असती तर थोडी मजा वाढली असती असं वाढतं. सिनेमॅटोग्राफर सेतूच्या कॅमेऱ्यानं 1988 ते 2010 हा काळ अगदी छान पकडलाय. ‘चिल्लर पार्टी’ आणि ‘भूतनाथ रीटर्न्स’ दिग्दर्शित करणाऱ्या नितेश तिवारीनं ही सर्व भट्टी अतिशय छान जमवली आहे, एक दिग्दर्शक या नात्यानं त्याचं अधिक कौतुक करायला हवं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या