Advertisement

Exclusive : कॅामन मॅन रिअॅक्ट झाला तरच अॅथॅारिटीचे डोळे उघडतील : महेश मांजरेकर

शिवाजी पार्कने आजवर खूप पाहिलं आहे. तिथे महानिर्वाण दिनही होतो आणि बाळासाहेबांचं दसरा संमेलनही व्हायचं. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित वाडेकर इथंच खेळले. रमाकांत आचरेकर आणि आण्णा वैद्य यांनी इथंच बरेच विद्यार्थी घडवले. इथं दोन वर्षांची मुलं फुटबॅालही खेळतात आणि दुसऱ्या कोपऱ्यात मल्लखांबही करतात.

Exclusive : कॅामन मॅन रिअॅक्ट झाला तरच अॅथॅारिटीचे डोळे उघडतील : महेश मांजरेकर
SHARES

दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी नेहमीच वेगळ्या वाटेने जाणारे सिनेमे बनवले आहेत. वास्तववादी घटनांना फॅण्टसीची जोड देण्याचं कसब मांजरेकरांना चांगलंच अवगत आहे. ‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमात त्यांनी एका ज्वलंत मुद्याकडं लक्ष वेधताना त्याला फॅण्टसीची जोड दिली आहे.

दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, अशोक सराफ, सतिश आळेकर, शिवाजी साटम या दिग्गजांना एकत्र आणत मांजरेकरांनी ‘मी शिवाजी पार्क’ बनवला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचित करताना महेश मांजरेकरांनी या सिनेमाच्या विषयावर प्रकाश टाकताना आजच्या समाजव्यवस्थेवर परखडपणे भाष्य केलं.



‘वास्तव’ कॅामन मॅन

आपल्या समाजात अनेक ज्वलंत मुद्दे आहेत जे चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवले जाऊ शकतात. ‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमातही मी अशाच प्रकारचा प्रयत्न करत वास्तव मांडलं आहे. आजही आपल्याकडे न्यायाला विलंब होतो हे कटू सत्य आहे. वर्षानुवर्षे केसेस चालतात, साक्षीदार, फिर्यादी मरतात. तरीही केसेस जिवंत असतात. घरंदारं विकली तरी अनेकांना न्याय मिळत नाही. ज्यांनी केस केलेली असते ते मरतात. त्यांना कळतही नाही आपल्या केसचं काय झालं? हे चित्र कुठंतरी बदललं पाहिजे.


न्याय व्यवस्थेकडून अपेक्षा!

न्याय लवकर मिळाला, तर खरा न्याय मिळेल असं मला वाटतं. त्यासाठी काही करता येईल का याचा विचार केला गेला पाहिजे. व्यवस्था बदलता येईल का ते पाहिलं पाहिजे. केसेस जास्त आहेत, तर न्यायाधीश जास्त नेमण्याची गरज आहे. न्यायाधीशही माणसं आहेत. त्यांनाही मर्यादा आहेतच. त्यांनाही त्यांचं खासगी जीवन आहे. त्यामुळे केवळ त्यांच्या नावाने ओरड करून उपयोगाचं नाही.


सिनेमात काय आहे?

व्यवस्थेने गांजल्यामुळे रिअॅक्ट झालेल्या पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट या सिनेमात आहे. खरं तर असं होत नाही, पण होण्याची शक्यता आहे. ही माझी फॅण्टसी आहे. बॅक आॅफ द माइंड तेच आहे की, न्याय वेळेवर मिळावा. केस लढवण्यासाठी पैसे लागतात. त्यामुळे एखाद्या माणसाला केस लढवायची असेल, तर त्याला सब्सिडी मिळायला हवी. चित्रपटातील मुख्य मुद्दा ‘मी शिवाजी पार्क’ पाहिल्यावरच समजेल.


वास्तवाला फॅण्टसीची जोड

मला असं कायम वाटतं की, कुठंतरी कॅामन मॅनने रिअॅक्ट झालं तर आणि तरच अॅथॅारिटीचे डोळे उघडतील. कॅामन मॅननेच कायम क्रांती घडवली आहे. तो ज्यावेळी पेटून उठतो, त्यावेळी त्याला कोणीच थांबवू शकत नाही. या सिनेमातही तेच दाखवण्यात आलं आहे. यात मी जे दाखवलं आहे ती फॅण्टसी आहे. असं कोणी करत नाही, पण असं होऊ शकतं हे सुद्धा नाकारता येणार नाही. असं होईलही कदााचित.


दिग्गजांची मांदियाळी

जेव्हा सिनेमा लिहिला गेला, तेव्हा कास्टिंग डोक्यात होतं. सतिश आळेकर कोणाच्या अध्यात मध्यात नाहीत. त्यामुळे त्यांना तशीच भूमिका दिली आहे. शिवाजी साटम सेंट्रल बँकेत होता. तिथे पारशांची खूप खाती होती. शिवाजीला गुजराती चांगलं येतं हे ठाऊक होतं आणि मला लाऊड पारशी हवा होता. निवृत्त इन्स्पेक्टरसाठी अशोक सराफ परफेक्ट होते. प्रोफेसरच्या भूमिकेसाठी दिलीप प्रभावळकर अचूक निवड होती. या सर्वांची मोट कशी बांधायची हा प्रश्न मनातही आला होता. सर्वांना कथा ऐकवली, त्यांना ती आवडली आणि माझं काम सोपं झालं.



शीर्षक असं का?

शिवाजी पार्कने आजवर खूप पाहिलं आहे. तिथे महानिर्वाण दिनही होतो आणि बाळासाहेबांचं दसरा संमेलनही व्हायचं. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित वाडेकर इथंच खेळले. रमाकांत आचरेकर आणि आण्णा वैद्य यांनी इथंच बरेच विद्यार्थी घडवले. इथं दोन वर्षांची मुलं फुटबॅालही खेळतात आणि दुसऱ्या कोपऱ्यात मल्लखांबही करतात. बंगाली बांधवही देवीसाठी येतात आणि रामलीलासाठी उत्तर भारतीयही तितक्याच प्रेमाने येतात. शिवाजी पार्क सर्वांना एकाच लेव्हलवर आणतं. त्यामुळे मला असं वाटलं की, शिवाजी पार्क स्वत: बोललं तर जास्त बरं होईल.


लोकं एकरूप होतील!

शिवाजी पार्कवर येणारे आणि आजूबाजूला राहणारे सर्वच या सिनेमाशी एकरूप होतील. महाराष्ट्राची संस्कृती जपणारं हे एक केंद्रच आहे. तिथे येणारा गुजरातीसुद्धा मराठी बोलतो. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती जपली जाते. मी शिवाजी पार्क जातो याचा मला गर्व आहे. कारण मी तिथे जातो, तेव्हा मी कोणी मोठा दिग्दर्शक-अभिनेता नसतो तर तिथल्या माणसांचा मित्र असतो. शिवाजी पार्क हा वे आॅफ लाईफ आहे. असं पार्क प्रत्येक गावात असतं.



हेही वाचा -

‘मला आई व्हायचंय’ चित्रपटाचा हिंदी रिमेक

पृथ्वी थिएटरची चाळीशी!




 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा