Advertisement

'काहे दिया परदेस' फेम शुभांगी जोशी यांचं निधन


'काहे दिया परदेस' फेम शुभांगी जोशी यांचं निधन
SHARES

सहजसुंदर अभिनयाच्या बळावर लहानसहान भूमिकांनाही योग्य न्याय देण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी (७२) यांचं आज पहाटे निधन झालं. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास आणि मागच्या आठवड्यात अर्धांगवायूचा आघात झाल्यानं एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान दिवसेंदिवस त्यांची प्रकृती अधिकाधिक खालावली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी, सून आणि नातवंडं असा परिवार आहे. गोरेगाव इथं सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

शुभांगी यांच्या जाण्यानं त्यांच्यासोबत काम केलेल्या कलाकारांना धक्का बसला आहेच. त्यासोबतच मालिका विश्वातूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. मनमिळावू आणि प्रेमळ स्वभावामुळे त्या कोणत्याही नव्या मालिकेच्या टीममध्ये पटकन मिसळून जायच्या. जुन्या काळातील कलावंतांशी जसे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते तसेच आजच्या पिढीतील कलाकारांशीही होते

अलीकडच्या काळात त्यांनी ‘काहे दिया परदेस’ या मालिकेत साकारलेल्या आजीची भूमिका खूप गाजली होती. मालवणी बोलणाऱ्या या आजीनं घराघरात आपला वेगळा चाहतावर्ग निर्माण केला होता. मालवणी बोली भाषेतील हे कॅरेक्टर वठवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली होती. कारण त्यापूर्वी त्यांनी कधीच फुल-फ्लेज मालवणी व्यक्तिरेखा साकारलेली नव्हती. फार पूर्वी दिवंगत अभिनेते मच्छिंद्र कांबळी यांच्या ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या निमित्तानं आपल्याला थोडंफार मालवणी बोलण्याचा योग आला होता, असं त्यांनी ‘काहे दिया परदेस’च्या निमित्तानं ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना सांगितलं होतं.

शुभांगी जोशी यांची भूमिका असलेली ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ ही मालिका सध्या कलर्स मराठीवर सुरू आहे. या मालिकेत त्या जीजीची भूमिका साकारत होत्या. यातील जीजीसुद्धा ‘काहे दिया परदेस’प्रमाणे अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती. ‘आभाळमाया’ या गाजलेल्या मालिकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा