Advertisement

स्वीडनमध्ये रंगणार मराठी सिनेमांची मेजवानी...


स्वीडनमध्ये रंगणार मराठी सिनेमांची मेजवानी...
SHARES

स्वीडन फिल्म असोसिएशन आणि विन्सन वर्ल्ड, गोवा इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिवल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदाच मराठी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं स्टॉकहोम स्वीडन येथे 20 ते 24 एप्रिल दरम्यान आयोजन करण्यात आलं आहे. त्यामुळे मराठी सिनेमाला आणखी एक मोठा इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म मिळणार आहे. नुकतीच या फिल्म फेस्टिवलबाबत माहिती देण्यासाठी वरळीतल्या 'सनविला बँक्वेट'मध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली. पत्रकार परिषदेला नागेश भोसले, तनिषा चॅटर्जी, स्वप्ना पाटकर, संजय राऊत, नानिक जयसिंघानिया, समित कक्कड, समृद्धी पोरे, भरत दाभोलकर, अनंत महादेवन, गजेंद्र अहिरे, विश्वास जोशी, मृणाल कुलकर्णी, शेखर सारतांडेल, सुनील सुखथनकर, मोहन आगाशे, मोनिश बबरे, सुहास, विधी कासलीवाल आणि सुनील फडतरे हे उपस्थित होते. या फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात अनंत महादेवन यांच्या 'डॉ. रखमाबाई' या सिनेमाने होणार असून त्यानंतर हरिश्चंद्राची फॅक्टरी , अस्तु, एक हजाराची नोट, फँड्री, एक अलबेला, वजनदार, मी सिंधुताई सपकाळ, नटी खेळ, नटसम्राट, हाफ तिकीट, कट्यार काळजात घुसली, कासव, डॉ. प्रकाश बाबा आमटे, मला आई व्हायचंय, संहिता, रमा माधव, द सायलेन्स आणि एलिझाबेथ एकादशी हे सिनेमे दाखवले जाणार आहेत.

डॉ. रखमाबाई या सिनेमाचा प्रीमिअर इथे होणार असून या सिनेमाला महाराष्ट्र राज्याचा बेस्ट साउंड, कास्टिंग आणि आर्ट डिरेक्शनला पुरस्कार मिळाले आहेत. या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमा, सर्वोत्कृष्ट डिरेक्शन, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता यासाठी नामांकन मिळाले होते. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये मराठी सिने इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार असून स्वीडनमधील प्रेक्षकांना या कलाकारांशी संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे.

SIFA ही नॉन प्रॉफिट संस्था 2004 मध्ये कुंनी टॉपडेन आणि क्रिस्टर होलग्रेन यांनी सुरू केली. या संस्थेचे आधारस्तंभ असलेले कुंनी हे गेली अनेक वर्ष दोन देशांमधील कला क्षेत्रातील, दोन देशांतील सिने इंडस्ट्रीतील अंतर कमी करण्यासाठी काम करत आहेत.

पत्रकार परिषदेत कुंनी टॉपडेन म्हणाल्या की, माझी भेट संजय शेट्ये यांच्याशी गोवा फिल्म फेस्टीव्हलच्या निमित्ताने झाली. मी मराठीतील अर्थपूर्ण सिनेमे पाहून खूप प्रेरित झाले. खासकरून गजेंद्र अहिरे यांचे सिनेमे आणि समृद्धी पोरे यांच्या मला आई व्हायचंय या सिनेमाने. त्यानंतर मी संजय शेट्ये यांच्यासोबत मिळून मराठी सिनेमा प्रमोट करण्याच्या उद्देशाने स्वीडन फिल्म फेस्टीव्हलची संकल्पना समोर आणली. SIFA ही संस्था विन्सन वर्ल्डच्या संयुक्त विद्यमाने स्वीडिश प्रेक्षकांसाठी दर्जेदार सिनेमे घेऊन येत असल्याचा आम्हाला अभिमान आहे.

याबद्दल संजय शेट्ये म्हणाले की, मला आनंद होतो की, 9 वर्षांआधी आम्ही गोव्यात सुरू केलेली गोवा फिल्म फेस्टिव्हलची संकल्पना आता आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे. आम्हाला याचाही आनंद होत आहे की SIFA सोबत आम्ही दर्जेदार मराठी सिनेमे स्वीडनला घेऊन जात आहोत. आम्हाला आशा आहे की स्वीडिश प्रेक्षकांसाठी ही चांगली मेजवानी ठरेल. कासव या सुमित्रा भावे आणि सुनील सुखटनकर यांच्या सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार मिळाला. हा सिनेमा स्वीडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये आम्ही दाखवत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतोय. स्वीडन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 20 ते 24 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात आला आहे.

संबंधित विषय
Advertisement