संस्कृती-परंपरेचं महत्त्व सांगणार सौरभचा 'शुभं भवतु'!

'शुभं भवतु' हा चित्रपट आताच्या पिढीला विचार करण्यास प्रवृत्त करेल आणि तंत्रज्ञानासोबत संस्कृतीची सांगड घालताना आपल्या प्राचीन आणि उदात्त संस्कृतीचं महात्म्य अधोरेखित करेल अशी अपेक्षा आहे.

SHARE

सध्याचं युग हे तंत्रज्ञानाचं युग म्हणून ओळखलं जातं. २४ तास आपण या तंत्रज्ञानाच्या गराड्यात अडकलेले असतो. आज प्रत्येक क्षेत्र तंत्रज्ञानानं काबीज केलं आहे आणि या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेल तर या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणं आवश्यक आहे. पण या सर्वांमध्ये संस्कृती आणि परंपराही टिकवून ठेवणं गरजेचं आहे. याचंच महत्त्व सांगणाऱ्या 'शुभं भवतु' या चित्रपटाला सुरुवात करण्यात आली आहे.


मुहूर्त संपन्न

एकविसाव्या शतकात प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना रूढी, परंपरा, संस्कृती आणि संस्कार यांचा अभिजात वारसा आपण विसरत चाललो आहोत. या तंत्रज्ञानाशी नातं जुळताना आपल्या संस्कृतीशी असलेली नाळ आपण तोडत तर नाही ना? तंत्रज्ञानाच्या प्रवाहात वाहत जाताना आपल्याला आपल्या संस्कारांचा विसर तर पडत नाही ना? अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणाऱ्या 'शुभं भवतु' या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांच्या हस्ते संपन्न झाला. 


तंत्रज्ञानाशी सांगड 

रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या 'सिंबा' या हिंदी चित्रपटात आजवर कधीही न साकारलेली व्यक्तिरेखा साकारलेला अभिनेता सौरभ गोखले या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी सौरभही उपस्थित होता. 'शुभं भवतु' हा चित्रपट आताच्या पिढीला विचार करण्यास प्रवृत्त करेल आणि तंत्रज्ञानासोबत संस्कृतीची सांगड घालताना आपल्या प्राचीन आणि उदात्त संस्कृतीचं महात्म्य अधोरेखित करेल अशी अपेक्षा आहे. 


नरेंद्र भिडेंचं पार्श्वसंगीत

सौरभ गोखलेसोबत सुखदा खांडकेकर, समीर धर्माधिकारी, कांचन गुप्ते, योगेश सोहोनी हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते आणि गीतकार डॉ. शरद नयमपल्ली आणि साधना नयमपल्ली असून निरंजन पत्की चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. कथा, पटकथा, संवाद आणि छायांकन सुनील खरे यांचं असेल, तर ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत चित्रपटाला लाभणार आहे. नरेंद्र भिडे हे चित्रपटाला पार्श्वसंगीत देणार आहेत.हेही वाचा - 

कादर खान यांची प्रकृती नाजूक; कॅनडात उपचार सुरू

सलमानला प्रशांतचं म्युझिकल बर्थडे गिफ्ट!
संबंधित विषय
ताज्या बातम्या