• 'झाला अनंत हनुमंत' चित्रपटाचा मुहूर्त
SHARE

स्फोटक विषय आणि पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध विजय तेंडुलकर यांच्या लेखनातील प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारुन तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. त्यांनी लिहिलेली 'शांतता कोर्ट चालू आहे', 'सखाराम बाईंडर', 'घाशीराम कोतवाल', 'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रुढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. त्यांचे अजून एक प्रभावशाली नाटक 'झाला अनंत हनुमंत' यावर निर्माते गिरीश वानखेडे चित्रपट बनवत आहेत आणि त्याचा मुहूर्त नुकताच कोल्हापुरात मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक मान्यवर आणि चित्रपटाचे कलाकार व चित्रपटाशी निगडित व्यक्तींच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला.

ही कथा एका सामान्य माणसाची आहे, ज्याला असामान्य सिद्धी प्राप्त होते. गरिबीमुळे ग्रासलेला. कटकटी तरीही प्रेमळ बायको, सतत आजारी असणारा मुलगा, बापाकडून अवास्तव अपेक्षा बाळगणारी मुलगी असा त्याचा छोटासा परिवार. त्यातच दुष्काळात तेराव्या महिन्याप्रमाणे फुकटखाऊ, झटपट श्रीमंतीची स्वप्न बघणारा मेव्हणा. कथेत अंधश्रद्धेबाबत असं काही घडतं की सर्वांना धक्काच बसतो.

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यावर नेहमीच चर्चा सुरु असतात. गेल्या काही वर्षात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी झटण्याऱ्या काही लोकांवर सनातनी विचासरणीच्या लोकांनी प्राणघातक हल्लेही केलेत. तेंडुलकरांनी आपल्या बोचक आणि खोचक शैलीत 'झाला अनंत हनुमंत' नाटकात यावर प्रकाश टाकला आहे. त्यांच्या प्रतिभावान लेखणीतून उतरलेल्या या कलाकृतीचा सन्मान करण्याच्या हेतूने निर्माते गिरीश वानखेडे यांनी या नाटकावर चित्रपट बनविण्याचा धाडसी निर्णय घेतलाय.

नाटकाप्रमाणेच चित्रपट उपहासात्मक डार्क-कॉमेडी असेल. कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपट भाष्य करेल. (Entity One Pictures) एंटीटी वन पिक्चर्सच्या बॅनरखाली झाला अनंत हनुमंत ची निर्मिती करीत आहेत गिरीश वानखेडे.  विजय तेंडुलकरांच्या कथेवर झाला अनंत हनुमंतची पटकथा मुन्नावर भगत यांनी लिहिली असून दिग्दर्शनही तेच करणार आहेत.  चित्रपटात नंदू माधव,  मंगेश देसाई, सिया पाटील, शांता तांबे, पूजा पवार, सोनाक्षी मोरे यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या