Advertisement

स्वतःला सिद्ध करायला हवं - धनश्री काडगावकर


स्वतःला सिद्ध करायला हवं - धनश्री काडगावकर
SHARES

नवरात्री म्हणजे स्त्रीशक्तीचा अखंड जागर. अशाच एका महिला शक्तीची कहाणी आज आपण तिच्याचकडून ऐकणार आहोत. तिचं बालपण, तिचं मुंबईशी असलेलं नातं, तिच्या आयुष्यातील खास प्रसंग हे सगळं तिने 'मुंबई लाइव्ह'सोबत शेअर केलंय. तिचं नाव आहे धनश्री काडगावकर


मुंबई आणि तुझं नातं या बद्दल काय सांगशील?

मला लहानपणापासूनच असं वाटायचं की मला पुणे किंवा यूएसला राहायचंय. मी माझ्या बाबांना नेहमी सांगायचे, 'मला प्लीज यूएसचा मुलगा बघा लग्नासाठी'. त्यामुळे माझं आधीच हे ठरलं होतं, एकतर पुणे किंवा यूएस. पण मी योगायोगाने या क्षेत्रात आले आणि मला कामानिमित्त मुंबईत जावं लागलं. पण नंतर मला मुंबई जी काय आवडायला लागली, ते मी खरंच शब्दात नाही सांगू शकत. खरंतर मुंबईत मी एकटी होते, पण तरीही ती मला आपलीशी वाटली. मरिन लाईन्स ही माझी सर्वात आवडती जागा आहे. मी कित्येक वेळा जेव्हा एकटं वाटायचं किंवा असं काही असतं जे आपण कोणाशीच शेअर नाही करू शकत, तेव्हा मी एकटी जाऊन मरिन लाईन्सला बसायचे.



मला मुंबईत खूप चांगली माणसं मिळाली. मी माझ्या डान्स टीचरच्या घरी पीजी म्हणून राहायचे. त्यांच्या घरी पण मला सतत मदत करणारी लोकं होती. त्यानंतर मी मालाडला पीजी म्हणून एका काकूंकडे शिफ्ट झाले. तेव्हा तिथेही मला खूप प्रेम मिळालं. त्या माझ्या मालिका बघायच्या. त्यामुळे माझे खूप लाड ही झाले. त्यानंतर मी काही महिने अदिती सारंगधरकडे राहिले आणि तिने ही अगदी कमी भाडं घेऊन मला राहायला दिलं. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं, मला मुळात सर्वच माणसं खूप चांगली मिळाली. आता माझं शूट कोल्हापूरला सुरु असतं, पण मी मुंबईला प्रचंड मिस करते. मुंबईत खूप गर्दी असू देत, ट्रॅफिक असू देत, पाऊस असू देत, पण तरीही मला मुंबई खूप आवडते. कारण तिथलं स्पिरिट तिथलं वर्क कल्चर हे सगळंच मला खूप आवडतं.



सामान्य माणसांना कलाकारांच्या आयुष्याचं नेहमीच अप्रूप वाटतं. पण त्या ठिकाणी पोहचणं कोणत्याच कलाकारासाठी सोपं नाही. तुझ्यासाठी हे किती कठीण होतं?

माझी पहिली सीरिअल संपल्यानंतर मला २ गोष्टी ऑफर झाल्या होत्या. एक सीरिअल होती ज्यात माझा लीड रोल होता, पण ते चॅनल खूप मोठं नव्हतं आणि प्रोडक्शन हाऊसही नवीन होतं. त्यामुळं तिथे पैसे कमी मिळणार होते. आणि दुसरी ऑफर हाती तिथे रोल कमी होता, पण चॅनेल खूप मोठं होतं. त्यामुळं मी खूप लोकांपर्यंत पोहचले असते. मला समजत नव्हतं मी काय करू? खूप विचार केल्यानंतर मी पहिला पर्याय निवडला. कारण त्यात पैसे कमी असते तरी रोल आणि विषय या दोन्ही गोष्टी वेगळया होत्या. मी माझ्या काही मित्रमैत्रिणींना विचारलं, तेव्हा त्यांनी ही मला सांगितलं की तू दुसरा पर्याय निवड. कारण तिथं रीच जास्त आहे आणि पैसे ही. पण मी तरीही माझ्या मनाला जे वाटलं ते केलं. आणि दुसरी गोष्ट अशी की 'गंध फुलांचा गेला सांगून' या सीरिअल नंतर मला खूप ऑफर्स यायला लागल्या. पण त्या काळात मी ठरवलं, की मला थोडंस थांबायचं आहे आणि एखादं नाटक किंवा सिनेमा करायचा आहे.



मला स्वतःमधलं पोटेन्शिअल बघायचं होतं मला. म्हणून मी ब्रेक घेतला. त्या ब्रेकमध्ये मी जवळजवळ ४० ते ४५ ऑडिशन्स दिल्या. आजही त्याची डायरी माझ्याकडे आहे. पण मला जे हवंय, ते माझ्याकडे येत नव्हतं आणि जे करायचं नव्हतं तेच काम माझ्याकडे येत होतं. त्या नंतर मी 'चिठ्ठी' नावाचा सिनेमा केला. तो अजून प्रदर्शित व्हायचाय. पण त्या सिनेमासाठी मला स्टेट लेवलचं 'बेस्ट डेब्यू'चं अॅवॉर्ड मिळालं. मी स्वतःला भाग्यवान समजते, कारण मी जे ठरवलं होतं ते मी केलं.



कधी कधी आपल्यासमोरच खूप आकर्षित करणाऱ्या गोष्टी असतात. एखादं काम निवडताना खूप प्रश्न असतात. अशा वेळी आपण स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला नक्की काय हवंय, हे समजायला हवं. आणि हो, नक्कीच आता सुरु असलेली मालिका 'तुझ्यात जीव रंगला' ही सुद्धा एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल. कारण पुन्हा एकदा मी एक मोठं फेम अनुभवतेय. 'गंध फुलांचा गेला सांगून गेला' या मालिकेनंतरची. काही लोकांनी तर मला सांगितलं की 'हा रोल कसा करतेस? तुझे एवढे चांगले लीड रोल असताना' पण तरीही मी ही रिस्क घेतली आणि मला नेहमी असं वाटतं की आयुष्यात रिस्क ही घेतलीच पाहिजे.



नवरात्र म्हणजे देवीचा सण. महिलांनाही आपण देवीचं रूप मानतो. नवदुर्गा म्हणून संबोधतो. पण काही ठिकाणी अगदी उलट चित्रही पाहायला मिळतं. या सगळ्याकडे तू कशी पाहतेस?

खूप मुलं किंवा पुरुष 'वूमन एम्पॉवर'बद्दल बोलत असतात. पण प्रॅक्टिकल लेव्हलला खरंच ते एवढे सपोर्टिव्ह असतात का? पण मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने काम करायला हवं, स्वावलंबी असायला हवं. आपल्या समाजात अर्निंग म्हणजे कमवणं हा खूप मोठा फॅक्टर आहे. तुम्ही कमवत असाल, तर तुमच्याकडे तेवढी पॉवर असते. बऱ्याचदा पुरुषांकडून म्हटलं जातं, 'तू मुलगी आहेस, हे तू नाही करू शकत'. मला स्वतः आताची सीरिअल करत असताना खूप लोकांकडून अपमान पचवावे लागले आहेत. पण त्यावेळी आपण फक्त शांत बसून स्वतःला सिद्ध करणं खूप गरजेचं आहे.



महिलांसाठी काय संदेश देशील ?

मला एवढंच सांगायचंय, की आयुष्यात खूप उतार चढाव असतात. खूप असे प्रसंग येतात ज्यात आपल्या पदरी सतत निराशा पडते. माझ्या स्वतःच्या आयुष्यात ही असे बरेच प्रसंग आले होते. म्हणून मी ब्रेक घेतला. पण या सर्व गोष्टींबरोबर स्वतःही विलिंग पॉवर खूप स्ट्राँग असायला हवी. मी रोज एक व्यायाम करायचे, ज्यात आरशासमोर उभं राहून कुठेही स्वतःला कमी आहे असं न सांगता, तुम्ही किती सुंदर आहात, तुमच्यामध्ये ती शक्ती आहे असं प्रत्येक महिलेने स्वतःला रोज सांगायला हवं. कारण कुठेही जो न्यूनगंड असतो तो जायला हवा.





डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा