विनोदी कार्यक्रम कोणाला आवडत नाहीत? या धकाधकीच्या, कामाच्या ताणातून दोन घटका हसायला मिळालं, तर सगळ्यांनाच आवडेल. हीच गरज हेरून झी टॅाकीज या चित्रपट वाहिनीने मनोरंजनाच्या क्षेत्रात आणखी एक पाऊल टाकत 'न.स.ते. उद्योग' हा एक हलका-फुलका विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. न.स.ते. उद्योग या कार्यक्रमातून प्रेक्षकांना धमाल अभिनय, खळखळून हसवणारे संवाद आणि निखळ मनोरंजनाची ट्रीट मिळणार आहे.
या कार्यक्रमाद्वारे मराठी सिनेमा आणि नाटकांमधील दिग्गज कलाकार छोटा पडदा गाजवायला येत आहेत. न.स.ते. उद्योग करण्यासाठी सुप्रसिद्ध अभिनेते संजय नार्वेकर आणि त्यांच्याबरोबर निलेश दिवेकर, नम्रता आवटे, पंकज पंचारिया, जनार्दन लवंगारे हे विनोदवीर पुढाकार घेणार आहेत. दर आठवड्याला एक नवा उद्योग करत या विनोदवीरांचे न.स.ते. उद्योग हास्याची कारंजी फुलवणार आहेत!
शिऱ्याच्या भूमिकेतून गाजलेले आणि सध्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये कार्यरत असलेले विकास कदम आपल्या विनोदाचे 'उत्कृष्ट टायमिंग' घेऊन प्रथमच मराठी टेलिव्हिजन शो च्या दिग्दर्शनात उतरत आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा न.स.ते.उद्योग हा नवीन कार्यक्रम २९ ऑक्टोबरपासून दर रविवारी रात्री ९.०० वा. झी टॅाकीजवर पहाता येईल.