ज्येष्ठ पार्श्वगायक अरुण दाते यांचं रविवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने भावसंगीताचा 'शुक्रतारा' निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.
'शुक्रतारा मंद वारा चांदणे पाण्यातुनी'...'येशील येशील येशील, राणी पहाटे पहाटे येशील'...'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी'....'दिवस तुझे हे फुलायचे'...'अखेरचे येतील माझ्या शब्द तेच कानी'...आणि 'या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे'...अशा सुरेल भावगीतांचा नजराणा पेश करत दाते यांनी दोन पिढ्यांवर अधिराज्य गाजवलं.
दाते मागील काही दिवसांपासून आजारी होते. प्रकृती खालावल्याने पहाटे ६ वाजता त्यांनी कांजुरमार्ग येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वीच ४ मे रोजी त्यांनी आपला ८४ वा वाढदिवस साजरा केला. त्यांना या निमिताने पुण्यात एका कार्यक्रमाचं निमंत्रण होतं, पण तब्येत बरी नसल्याने ते जाऊ शकले नाही. ते सध्या मुलगा अतुल दाते यांच्यासोबत राहत होते.
दाते यांच्यावर सायन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.