• वामन केंद्रेंच्या मुलाचा 'ड्राय डे'
SHARE

प्रथितयश माता-पित्याच्या अपत्याला कलाक्षेत्रात लवकर जम बसवता येतो, असं मानलं जातं. ऋत्विक केंद्रे या युवकालासुद्धा आता चित्रपटसृष्टीत बस्तान  बसवायचं आहे. आई-बाबांच्या नावावर नाही, तर स्वतःच्या अभिनयगुणांवर. ऋत्विक केंद्रे म्हणजे रंगभूमीवर मास्तर म्हणून ओळखले नाट्य दिग्दर्शक आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा(एनएसडी)चे संचालक वामन केंद्रे आणि अभिनेत्री गौरी केंद्रे यांचा मुलगा. काही मराठी आणि हिंदी मालिकांमधून काम केल्यानंतर ऋत्विक केंद्रेला चित्रपटात महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे. मालिकांप्रेमींमध्ये  'विहान' नावाने प्रसिद्ध असलेला ऋत्विक 'ड्राय डे' या आगामी चित्रपटात अजय ही व्यक्तिरेखा साकारत चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. नाट्यविश्वात लौकिक मिळवणाऱ्या दांपत्याचा मुलगा म्हणून आपल्याकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा असणार, याची ऋत्विकला पूर्ण जाणीव आहे. या अपेक्षांचं दडपण आल्याचंही तो प्रामाणिकपणे मान्य करतो. चित्रपटसृष्टीत स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला आहे. 


'ड्राय डे' चित्रपटात ऋत्विकसोबत मोनालिसा बागल ही अभिनेत्री झळकणार आहे. या दोघांवर चित्रित झालेलं चित्रपटातलं 'अशी कशी' हे प्रेमगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे. 'ड्राय डे'चं लेखन दिग्दर्शन संजय पांडुरंग जाधव यांनी केलं असून, नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले आहेत. तरुणाईभोवती केंद्रीत झालेला हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या