तुम्ही पाहिलंत का ह्या 'छोट्या राणा'दा ला ?

 Mumbai
तुम्ही पाहिलंत का ह्या 'छोट्या राणा'दा ला  ?

‘चालतंय की...’ म्हणत समस्त मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा कोण, असे विचारले तर एकच उत्तर सर्वांकडून येईल आणि ते म्हणजे, `राणादा`.

 ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील हा पहेलवान गडी सध्या खूपच लोकप्रिय झाला आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना या राणाने वेड लावले आहे. शरीराने जरी दांडगा पहेलवान असला तरी मनाने अतिशय साधा सरळ असलेल्या राणाच्या स्वभावामुळेच अंजलीही त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांचे लग्नही झाले. राणाचे सर्व गुण चांगले असले तरी त्याचे शिक्षणापासून दूर पळणे, पुस्तकांना घाबरणे या गोष्टी अंजलीला आवडत नाहीत. लग्नानंतर अंजलीची वाचनाची आवड जपण्यासाठी राणा स्वतःहून तिला पुस्तके आणून देतो. परंतु, स्वतः मात्र त्यापासून दूर पळतो. मग, अंजलीसुद्धा राणाला शिकविण्याचा चंग बांधते आणि त्या दिशेने प्रयत्न करायला लागते. परंतु त्यात तिला अपयशच येते. आता, गोदाक्का तिला राणाच्या या भीतीमागचे कारण सांगणार आहेत आणि यातूनच राणाचा बालपणीचा प्रवास उलगडणार आहे.

राणाच्या बालपणीची हीच गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे गुरुवारपासून. राणाला अभ्यासाची भीती का वाटते? तो मुलींशी बोलायला का घाबरतो? त्याला कुस्तीचा छंद कसा जडला? बरकतची आणि त्याची मैत्री कशी झाली? या सगळ्या गोष्टींची उत्तरे येत्या काही भागांमधून बघायला मिळणार आहेत. रुद्र रेवणकर या बालकलाकाराने हा छोटा राणा साकारला आहे. त्यामुळे बालपणीच्या या राणाची धम्माल मस्ती बघायला विसरू नका.


Loading Comments