Advertisement

वैशाली माडेच्या आवाजात येणार ‘डीजेवाला दादा’

डीजे ऑपरेटरवर आधारित अनेक हिंदी-मराठी गाणी आतापर्यंत आली आणि हिटही झाली. हे गाणं या सर्वांत वेगळं असल्याचं सांगितलं जात आहे. ‘भावा, मित्रा, दादा...’ सारखे आदरार्थी शब्दरचनेसोबत वैशालीच्या आवाजाचा मराठमोळा ठसका हे या गाण्याचं वेगळेपण आहे.

वैशाली माडेच्या आवाजात येणार ‘डीजेवाला दादा’
SHARES

सारेगमप २००७ ची विजेती आणि ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा...’ गाण्याच्या ठेक्यावर सर्वांना ताल धरायला लावणारी मराठमोळी गायिका वैशाली माडेचा एक नवीन अल्बम साँग लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. थोडक्यात काय तर वैशाली आता ‘डीजेवाला दादा’च्या तालावर अबालवृद्धांना नाचवणार आहे.


प्रवीण कुवर यांचं संगीत

प्रिती नाईक निर्मित आणि पराग भावसार दिग्दर्शित ‘डिजेवाला दादा’ या वैशालीच्या आवाजातील नव्या गाण्याचं रेकॉर्डींग अंधेरी येथील अशोक होंडा स्टुडिओमध्ये नुकतंच पार पडलं आहे. झी मराठी वरील ‘लागीरं झालं जी’ या लोकप्रिय मालिकेचं पार्श्वगीत, ‘ये रे ये रे पावसा’ चित्रपटाचं शीर्षक गीत, ‘लव्ह लफडे’ चित्रपटातील ‘ताईच्या लग्नाला...’ यासारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांनीच ‘डिजेवाला दादा’ हे गाणं देखील संगीतबद्ध केलं आहे.


डीजेवाल्यांना प्रोत्साहन

हे गाणं खास डीजेवाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बनवलं असल्याचं या गाण्याचे गीतकार कौतुक शिरोडकर यांचं म्हणणं आहे. या गाण्याला योग्य तो ठसकेबाजपणा आणण्यासाठी गाण्याच्या शब्दरचनेवर त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. नवोदित मराठी अभिनेत्री दिपाली सुखदेवे या गाण्यातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन राजेश बिडवे करणार असून, लवकरच या गाण्याच्या चित्रीकरणालाही सुरूवात करण्यात येणार आहे.


मराठमोळा ठसका

आजकाल लग्न समारंभ अथवा इतर कोणत्याही सणसमारंभात डीजेचा वापर सर्रासपणे होताना दिसतो. त्यामुळे त्या डीजे ऑपरेटरवर आधारित अनेक हिंदी-मराठी गाणी आतापर्यंत आली आणि हिटही झाली. हे गाणं या सर्वांत वेगळं असल्याचं सांगितलं जात आहे. ‘भावा, मित्रा, दादा...’ सारखे आदरार्थी शब्दरचनेसोबत वैशालीच्या आवाजाचा मराठमोळा ठसका हे या गाण्याचं वेगळेपण आहे. डीजेवाल्यांसाठी पहिल्यांदाच असे शब्द गाण्यात वापरले गेल्यामुळे आगळ्या-वेगळ्या धाटणीचं हे हटके गाणं प्रेक्षकांच्या पसंतीत नक्की उतरेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.



हेही वाचा -

#MeeToo मुळे खलनायकांचा ‘थरथराट’!

माझ्यासोबत कोणी चुकीचं वागून पळून जाऊ शकत नाही - लता मंगेशकर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा