Advertisement

आलिया-शाहरूखची लक्षात राहणारी केमिस्ट्री


आलिया-शाहरूखची लक्षात राहणारी केमिस्ट्री
SHARES
Advertisement

केवळ एकाच चित्रपटामधून आपल्याबद्दलच्या अपेक्षा कमालीच्या उंचावणारी आपल्याकडची आघाडीची दिग्दर्शिका म्हणून गौरी शिंदेचं नाव घ्यावं लागेल. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या आपल्या पदार्पणातील चित्रपटाद्वारेच गौरीबद्दलच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र पहिला चित्रपट कमालीचा यशस्वी ठरूनही या दिग्दर्शिकेनं आपला पुढील चित्रपट बनवायला तब्बल चार वर्षं घेतली. मात्र ‘डियर जिंदगी’ पाहताना ही चार वर्षांची गॅप योग्य असल्याचं लक्षात येतं. आजच्या तरुणाईला नातेसंबंधांबद्दल भेडसावणारे अनेक प्रश्न, बालपणात घडलेल्या घटनांच्या धसक्यातून मनातील भीती दिग्दर्शिकेनं पडद्यावर मांडली आहे. प्रेम, मैत्री, नातेसंबंध यावर हा चित्रपट खूप खोलात जाऊन भाष्य करतो. चित्रपट माध्यमाच्या चौकटीत न बसणाऱ्या बऱ्याच गोष्टी या चित्रपटात असल्यामुळे तसेच काही गोष्टींच्या पुनरावृत्तीमुळे तो बऱ्याचदा रेंगाळतो. मात्र, तरीदेखील दिग्दर्शिकेला आपल्याला काय सांगायचंय हे पक्कं ठाऊक असल्यामुळे हा चित्रपट शेवटाला काही तरी छान सांगून जातो. आलिया भट आणि शाहरूख खान या ‘ऑड पेअर’ची रुपेरी पडद्यावरील जमलेली केमिस्ट्री हे या चित्रपटाचं सर्वात मोठं आकर्षण मानावं लागेल. किंबहुना या दोघांच्या अप्रतिम कामगिरीमुळेच गौरी शिंदेंनी हाताळलेल्या या अवघड विषयाची नैय्या किनाऱ्याला लागली आहे.

‘डियर जिंदगी’ ही कायरा (आलिया भट) या आजच्या काळातील मॉडर्न तरुणीची गोष्ट आहे. कायरा एक सिनेमॅटोग्राफर असते. जाहिरातींच्या शूटची कामं असली तरी ती फारशी त्यात खूश नसते. तिला स्वतःला एक चित्रपट दिग्दर्शित करायचा असतो. तिचं हे स्वप्न सत्यात उतरण्याची चाहूल लागते ती राघवेंद्रकडून (कुणाल कपूर). या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तिला विदेशात जायचे असते. राघवेंद्रचं कायरावर प्रेम असतं आणि बऱ्याच नातेसंबंधांतून पुढे गेलेल्या कायराला राघवेंद्र आवडू लागलेला असतो. मात्र विदेशात पोचण्याआधीच कायराला राघवेंद्रचं त्याच्या पूर्वाश्रमीच्या मैत्रिणीशी नातं जुळल्याचं कळतं. कायराला बसलेला हा खूप मोठा धक्का असतो. त्यामधून सावरण्यासाठी कायरा आपल्या आई-वडिलांकडे-गोव्याला जाते. तिथं जाऊन तिची आणखीनच चिडचिड वाढते. याचवेळी कायराला जहांगीर खान ऊर्फ जग हे विख्यात मानसोपचारतज्ज्ञ भेटतात आणि ती आपल्या सध्याच्या विचित्र मनोवस्थेवरील उपाय शोधण्यासाठी डॉ. जगना भेटते. डॉ. जग यांची रुग्णावर उपचार करण्याची पद्धत अनोखी असते. ते तिला आपल्या घरी बोलावतात आणि कोणतेही उपचार करण्याआधी ते तिच्या पूर्वायुष्यात आणि वर्तमानामध्ये डोकावतात. यामधून या दोघांमध्ये एक छान नातं निर्माण होतं. कायराच्या बालपणी अनेक विचित्र घटना घडलेल्या असतात नि त्यातूनच तिच्या मनात आपल्या आई-वडिलांबद्दल एक विचित्र अढी निर्माण झालेली असते. त्यामुळेच ती सर्व नात्यांकडेच नेहमीच संशयानं पाहत असते. मात्र डॉ. जग आपल्या अनोख्या शैलीद्वारे तिच्या मनातील हा संशय दूर करतो. डॉ. जगची ही शैली कायराच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमभावना निर्माण करते. मात्र डॉ. जग हे समजल्यानंतर ते तिला आपल्या दोघांच्या नात्यांमधील वास्तवाची जाण करून देतात. तसेच आयुष्याटा जोडीदार शोधण्याचा मार्गही दाखवतात.

‘डियर जिंदगी’ची कथा-पटकथा-संवाद-दिग्दर्शन अशी चौफेर जबाबदारी सांभाळली आहे ती गौरी शिंदे यांनीच. आजच्या तरुणाईला भेडसावणारे अनेक प्रश्न मांडताना दिग्दर्शिकेनं पालक आणि नवीन पिढीत निर्माण झालेली दरी खूप छान पद्धतीनं दाखवली आहे. पालकांकडून आपल्या मुलांबाबत बालपणी नकळत झालेल्या चुका पुढे त्यांचं संपूर्ण आयुष्य कशा उदध्वस्त करू शकतात, याचंही दर्शन हा चित्रपट घडवतो. कायराचं नवीन नात्यांमध्ये गुरफटणं आणि त्यामधून बाहेर पडताना स्वतःबद्दलच वाईट मत करून घेण्याचे प्रसंग खूप छान जमलेत. तसेच कायरा नेहमीच आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये स्वतःला सुरक्षित मानत असते. मात्र प्रेमाचं नातं आलं की तिच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत असतात. दिग्दर्शिकेनं कायरा आणि डॉ. जग यांच्या नात्यामधून या सर्व प्रश्नांची खूप छान पद्धतीनं उत्तरं दिली आहेत. या सर्व प्रक्रियेदरम्यान चित्रपट बऱ्याचदा प्रबोधनात्मक झालाय. तसेच तो रेंगाळलायसुद्धा. कायराच्या बालपणाचा भाग थोडा मोठाच झालाय. परंतु, विषयाचा आवाका मोठा असल्यामुळे अशा त्रुटींना आपण नजरेआड करू शकतो. कायराचं डॉ. जग यांच्यामध्ये गुंतत जाण्यामुळे चित्रपटाच्या शेवटी काय होणार, याबद्दल दिग्दर्शिकेनं चांगली उत्सुकता निर्माण केली आहे. चित्रपटाचा हा शेवट फसला असता तर यापूर्वीच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरलं असतं. परंतु, सुदैवानं असं घडलेलं नाही आणि दिग्दर्शिकेनं खूप चांगल्यावर नोटवर चित्रपट संपवला आहे.
‘उडता पंजाब’मुळेच आलिया भटमध्ये दडलेल्या उत्तम अभिनेत्रीची झलक आपल्याला पाहायला मिळाली होती. ‘डियर जिंदगी’मधील तिची कामगिरी अधिकच सरस म्हणावी लागेल. कायराच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू तिनं अतिशय समंजसपणे साकारले आहेत. मुख्य म्हणजे शाहरुख खानसारख्या सुपरस्टारला कॉम्प्लिमेंट देणारा अभिनय करणं हेदेखील तिच्यासाठी मोठं चॅलेंज होतं. परंतु, ते तिनं लीलया पेललं आहे. शाहरुखच्या कारकिर्दीचं मूल्यमापन करायचं झाल्यास त्यानं आपल्यामधील अभिनेत्याची उंची तपासण्याचा खूपच कमी वेळा प्रयत्न केल्याचं दिसतं. त्याचा अशाप्रकारचा अगदी अलीकडचा प्रयत्न म्हणजे चक दे इंडीया हा चित्रपट. परंतु, तो पडद्यावर येऊनही आता बरीच वर्षं उलटली आहेत. डियर जिंदगीमध्ये त्याच्या भूमिकेची लांबी तशी खूप कमी आहे. परंतु, मोजक्याच प्रसंगांमध्ये त्यानं पूर्ण जीव ओतला आहे. आलिया आणि शाहरुखमधले बरीच दृश्यं जमली असली तरी गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरील कबड्डी खेळतानाचं दृश्य हायलाइट मानावं लागेल. इतर व्यक्तिरेखांमध्ये आलियाच्या मैत्रिणी लक्षात राहतात. कुणाल कपूर, अली जफर, अंगद बेदी आणि आदित्य रॉय कपूर यांच्या वाट्याला अगदी छोट्याशाच भूमिका आल्यात. अमित त्रिवेदी यांचं संगीत फार काही ग्रेट नसलं तरी चित्रपटाच्या कथानकाला ते पूरक आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या कॅमेऱ्यानं गोव्याचा निसर्ग छान टिपलाय. हेमंती सरकार यांची संकलनातील कात्री आणखी धारदार असती तर ‘डियर जिंदगी’ प्रेक्षकांच्या दृष्टीनं अधिक प्रिय ठरला असता.

संबंधित विषय
Advertisement