Advertisement

नात्यांना हळुवार स्पर्श करणारा 'हृदयांतर'!


नात्यांना हळुवार स्पर्श करणारा 'हृदयांतर'!
SHARES

आपल्या आजूबाजूला आपण अशी बरीच जोडपी पाहतो, ज्यांच्यात अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात आणि तेच वाद अगदी घटस्फोटापर्यंत जाऊन पोहोचतात. पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम घरातील लहान मुलांवर मात्र होतो. याच विषयावर आधारीत आहे 'हृदयांतर' हा मराठी सिनेमा.

अरेंज मॅरेज झालेले समायरा आणि शेखर जोशी. गेली १२ वर्ष ते एकमेकांसोबत संसार करतायत. त्यांना नित्या आणि नायशा या दोन गोड मुली ही आहेत. असं त्यांचं छोटं कुटुंब. समायरा, एका जाहिरात कंपनीत नोकरी करणारी असूनही काम आणि घर अगदी व्यवस्थित सांभाळणारी आणि या उलट शेखर अखंड आपल्या व्यवसायात गुंतलेला. त्याला घरी मुलींना, बायकोला द्यायला अजिबात वेळ नाही. आणि हेच त्यांच्या संसारात भांडण होण्याचं मुख्य कारण. शेखर आणि समायरा यांच्यातलं भांडण नंतर एवढ्या टोकाला जाऊन पोहचतं की त्यावर उपाय म्हणून घटस्फोट घेणं हा एकच पर्याय त्यांना दिसतो आणि ते दोघेही तो पर्याय निवडण्याचा निर्णय घेतात. 

या सगळ्या गोष्टी घडत असतानाच त्यांच्या कुटुंबावर अजून एक संकट कोसळतं. नित्या या त्यांच्या अवघ्या १० वर्षांच्या मुलीला रक्ताचा कॅन्सर होतो आणि सिनेमाची गोष्ट एक वेगळंच वळण घेते. आपल्या १० वर्षांचा मुलीला आजारातून बाहेर काढण्यासाठी शेखर आणि समायराची धडपड. कोणत्याही परिस्थितीत तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न, तिला आनंद मिळावा यासाठी कोणत्याही गोष्टी विचार न करता केलेल्या गोष्टी. हे खूप साध्या आणि आपलंस वाटणाऱ्या पद्धतीने सिनेमात मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि तो प्रयत्न यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाही. शेखर आणि समायरा वेगळे होतात का? नित्या आजारातून बाहेर येते का? हे सिनेमा पाहिल्यावर समजेलच.


सिनेमाचा मूळ विषय कुटुंब, दोन व्यक्तींमधले लग्नानंतरचे वाद आणि मुलीला वाचवण्यासाठी केलेली धडपड हा जरी असला, तरी बघताना सिनेमा खूप फ्रेश वाटतो. शेखर म्हणजे सुबोध भावे आणि समायरा म्हणजे मुक्ता बर्वे यांच्यासारखे तगडे कलाकार असताना या भूमिकांना योग्य न्याय मिळणारच हे वेगळं सांगायला नको. नवरा- बायको म्हणून किंवा मग आई- वडील म्हणून या दोघांनीही आपापल्या भूमिकांना पडद्यावर पुरेपूर उतरवलंय. कुठेही गरजेपेक्षा जास्त किंवा कमी असा यांचा अभिनय वाटत नाही. दोन मुलींची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या नित्या (तृष्णिका शिंदे) आणि नायश (निष्ठा वैद्य) या दोघींनीही त्यांच्या भूमिका छान साकारल्या आहेत. या चौघांपलीकडे या सिनेमात शेखर आणि समायरा यांच्या मैत्रिणीची भूमिका निभावलेली सोनाली खरे आणि डॉक्टरांच्या भूमिकेत दिसणारा अमित खेडेकर यांनी ही त्यांच्या भूमिका चांगल्या निभावल्या आहेत. 

सिनेमात अजून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे सिनेमाचं बॅकग्राऊंड म्युझिक. सिनेमात बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर करण्यात आला आहे. काही ठिकाणी त्याची गरज वाटते. पण काही ठिकाणी सीनची गरज नसताना उगाचच त्याचा वापर केला गेलाय असं वाटून जातं. सिनेमात संवाद खूप छान लिहिले गेले आहेत. सिनेमाचा प्लस पॉईंट सिनेमाच्या कलाकारांबरोबरच सिनेमातले संवादही आहेत. सिनेमातलं संगीतही छान झालंय.

सिनेमा विक्रम फडणीस यांचा असल्याने तो पाहताना तो चकाचकपणा दिसून येतो. मराठी सिनेमाचा हा पहिला प्रयत्न लक्षात घेता, विक्रम फडणीस यांचा हा प्रयत्न यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाही.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा