Advertisement

'इथं' आहे फुलपाखरांचं रंगीबेरंगी विश्व!

निसर्गाचं संवर्धन होणं काळाची गरज आहे. हिच बाब हेरून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)ने फिल्मसिटीतील नुकताच 'ब्रेकफास्ट विथ बटरफ्लाय' हा उपक्रम राबवला.

SHARES

छान किती दिसते फुलपाखरु...

या वेलींवर ! फुलांबरोबर

गोड किती हसते ! फुलपाखरु...

पंख चिमुकले निळे जांभळे

हलवूनी झुलते फुलपाखरु...

'टाईमपास' चित्रपटातील हे गाणं अनेकांच्या चांगलच ध्यानात असेल. . हा. पाटील यांनी लिहिलेलं हे गाणं चित्रपटात केतकी माटेगावकरवर चित्रित करण्यात आलं आहे. पण मला सध्या हे गाणं आठवतंय ते खऱ्या खुऱ्या फुलपाखरांसाठी... मोहक रंगसंगती, या फुलावरून त्या फुलावर बागडणारं फुलपाखरू लहानग्यांपासून ते आबालवृद्धांना सर्वांनाच भुरळ पाडतं. नाजूक फुलपाखरांच्या मागं धावणं हा तर लहानग्यांचा आवडीचा छंद. आपल्यापैकी अनेकांच्या लहानपणीच्या आठवणींचा एक कप्पा फुलपाखरांच्या किश्श्यांनी नक्कीच व्यापलेला असेल यात शंका नाही

पण, वाढत्या शहरीकरणात फुलपाखरांचं हे विश्व आपल्यापासून दूरावलं आहे. सिमेंटच्या जंगलात फुलपाखरांचं दर्शन होणं कर्मकठीण बाब. मुंबईत बोरिवली नॅशनल पार्क, कान्हेरी लेण्या, आरे काॅलनी आणि गोरेगाव पूर्वेकडील फिल्मसिटी परिसरात त्यांचं अस्तित्व काही प्रमाणात टिकून आहे. फुलपाखराचं अस्तित्व उत्तम निसर्गचक्राचं निदर्शक असल्याचं मानलं जातं. त्या दृष्टीने त्यांचं अर्थात निसर्गाचं संवर्धन होणं काळाची गरज आहे. हिच बाब हेरून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS)ने फिल्मसिटीतील  नुकताच 'ब्रेकफास्ट विथ बटरफ्लाय' हा उपक्रम राबवला

फुलपाखरांनी अंडी घालण्यापासून अंड्यातून बाहेर पडलेल्या अळीचं सुरवंटात होणारं रुपांतर, त्यानंतर रंगीबेरंगी पंखाचे हवेत झेपावणारे फुलपाखरू, असा फुलपाखरांचा जीवनप्रवास या उपक्रमाअंतर्गत अनुभवता आला. याशिवाय बीएनएचएस (BNHS)ने येथे 'फुलपाखरू उद्यान'ही विकसीत केलं आहे. या उद्यानात कोवळ्या किरणांच्या प्रकाशात विविध जातींचे रंगीबेरंगी फुलपाखरे बागडताना दिसतात

चारही बाजूंनी झाडांनी वेढलेल्या या उद्यानात फुलपाखरांना मुक्त वावर करता येतो. फुलपाखरांना आवश्यक वनस्पतींची लागवड या उद्यानात करण्यात आली आहे. फक्त उद्यानातच नाही तर सभोवतालच्या जंगलात अशोका, रुई, जमकैन स्पाइक अशा वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे


मुंबईत फुलपाखरांच्या एवढ्या जाती

मुंबईत फुलपाखरांच्या १५० प्रजाती आढळतात. ब्लू मॉर्मन, ब्लू बॉटल, कॉमन जे, टेल्ड जे, कॉमन माईम, कॉमन नवाब, स्किपर अशा अनेक प्रजाती लक्ष वेधून घेतात. सूर्योदयानंतर फुलपाखरं बाहेर पडतात. रात्रभर थंडावलेल्या शरीराला उब मिळावी म्हणून फुलपाखरं ऊन खायला बाहेर येतात


  • फुलपाखरांना ऐकू येत नाही पण ते स्पंजनं अनुभव करू शकतात. 
  • ते पायाच्या सहाय्यानं चव ओळखतात तर अँटीनाच्या सहाय्यानं वास घेतात.
  • फुलपाखरांना फुप्फुसे नसतात ते पोटावरील छीद्राच्या सहाय्यानं श्वसन करतात. 
  • फुलपाखरांच्या डोळ्यात सुमारे ६००० लेन्स असतात. त्यामुळे ते अल्ट्रावायलेट प्रकाश सुद्धा पाहू शकतात. 


काय खातात?

फुलपाखरू मध खातात हा चुकिचा गैरसमज सध्या प्रचलित आहे. फुलपाखरू हे कुजलेलं अन्न, फळं आणि पक्ष्यांची विष्ठा, मलमूत्र खातात. फुलपाखरांना दात नसतात त्यामुळे ते अन्नातील द्रव सोशून घेतात. गुलाब हे फुल तर फुलपाखरांना अजिबात आवडत नाही. 


फुलपाखरांचा जीवनप्रवास

अंडी, सुरवंटकोशित आणि फुलपाखरु असा त्यांचा जीवनप्रवास असतो. प्रत्येक फुलपाखरु विशिष्ट वनस्पतींवरच अंडी घालते. 'टायगर' ही फुलपाखराची प्रजाती रुईच्या पानावर, कॉमन माॅर्मन लिंबाच्या पानावर अंडी घालते. एका पानावर एकच अंडं घातलं जातं किंवा काही फुलपाखरं एकावेळी पुंजक्यांनी अंडी घालतात. ही अंडी वेगवेगळ्या आकाराची आणि रंगाची असतात.

त्यानंतर अंड्यातून सुरवंट बाहेर येतो. सुरवंट वाढता वाढता ५ वेळा कात टाकतो. सुरवंट कवचातून बाहेर आल्यावर प्रथम आपल्याच अंड्याचं कवच खातो. त्यानंतर तो आपला मोर्चा वळवतो झाडाच्या पानाकडे. अधाशासारखा तो पानांवर तुटून पडतो आणि अवघ्या काही तासांत पानांचा फज्जा उडवतो. याच कारणामुळे सुरवंटाची कमी वेळेत जलद वाढ होते.

सुरवंटांची पूर्ण वाढ झाल्यावर त्याचं कोषात रुपांतर होण्यास सुरुवात होते. या अवस्थेत सुरवंट झाडाच्या फांदीवर स्वत:ला लाळेच्या साहाय्यानं चिकटवतो. काही काळात त्याची कातडी उतरवण्याची प्रक्रिया सुरू होते. या काळात तो खात नाहीत आणि हालचाल देखील करत नाहीत. फुलपाखराची वाढ पूर्ण होताच कोवळ्या उन्हात कोशातून फुलपाखरू बाहेर येतं. सुरुवातीला उडण्यास असमर्थ असलेलं फुलपाखरु कोशावर बसून पंख वाळवतं. त्यानंतर ते आपली पहिली हवाई सफर करतं.


फुलपाखरांचं स्थलांतर

फुलपाखरे त्यांच्या आयुष्यात एकदाच स्थलांतर करतात. हे अंतर २ किलोमीटर ते ३००० किलोमीटर इतकं लांब असू शकतं. तापमानातील बदल, पाऊस, अतिथंड वातावरण आणि अन्न झाडांची कमतरता ही फुलपाखरांच्या स्थलांतराची मुख्य कारणं असू शकतात. फुलपाखरांचं आयुष्य एक महिना किंवा जास्तीत जास्त एक वर्ष असतं. जी पिढी दक्षिणेकडे स्थलांतर करून अंडी घालते ती तिकडेच मरते. त्यांची पुढची पिढी विरुद्ध दिशेनं म्हणजे उत्तरेकडे उडत येते. फुलपाखरु नेहमी एकत्र स्थलांतर करतात.


कमी वेळेत मादीला आकर्षित करतात

फुलपाखरे अल्पायुषी असतात. त्यामुळे त्यांना त्यांचा वंश वाढवण्यासाठी फार थोडा वेळ मिळतो. मादीला शोधण्यासाठी नर एका उंच फांदीवरून टेहळणी करतो. त्यामुळे सर्व माद्यांवर तो नजर ठेवतो. एकदा मादी दिसली की तो पुढच्या कामाला लागतो. मादी दिसली की नर तिच्या अवतीभवती फिरू लागतो. तिच्या पंखांना, पायांना स्पर्श करतो. तिनं साथ दिली तर त्यांच्यात मिलन होते. त्यांचे मिलन अर्धा तास किंवा २४ तास चालते.  


फुलपाखरांना निसर्गानं दिलाय एक खास गुण

फुलपाखरांचा वंश वाढावा यासाठी निसर्गानं एक खास गुण त्यांना दिला आहे. फुलपाखरातील काही प्रजाती विषारी असतात. ही फुलपाखरे फक्त त्यांच्या भक्ष्यकांकरता विषारी असतात. हा विषारी गुण त्यांना अन्नझाडांपासून मिळतो. त्यामुळे भक्ष्यकांपासून फुलपाखरांचं रक्षण होतं. डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय