लाॅकडाऊनचा असाही फायदा, ३० वर्षांनंतर कुर्ला, सायनमधील प्रदूषण घटलं

मुंबईतील सायन आणि कुर्ला हे भाग सर्वाधिक प्रदूषित मानले जातात. मात्र मागील ३० वर्षांत पहिल्यांदाच कुर्ला आणि सायनमधील हवेची गुणवत्ता चक्क उत्तम श्रेणीत आली आहे.

लाॅकडाऊनचा असाही फायदा, ३० वर्षांनंतर कुर्ला, सायनमधील प्रदूषण घटलं
SHARES

नेहमीच गजबलेली, वाहतूककोंडीत अडकलेली मुंबई (mumbai air quality) असं या शहराचं वर्णन केलं जातं. घरातून रस्तेमार्गाने आपल्या कामाधंद्याच्या ठिकाणी पोहोचायला मुंबईकरांना किमान तासभर तरी लागतोच. मुंबईच्या रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा मिळत नाही, इतक्या गाड्या दिवस-रात्र धावत असतात, त्यामुळे सहाजिकच वायू प्रदूषणातही भर पडत असते. परंतु लाॅकडाऊनमुळे (lockdown) कधी नव्हे, ते पहिल्यांदाच मुंबईतील प्रदूषण (pollution in mumbai) घटून हवेची गुणवत्ता सुधारली आहे.  

हेही वाचा- महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज

कोरोना व्हायरसचा (coronavirus) संसर्ग वाढू नये म्हणजे मुंबईसह देशभरात लाॅकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे जीवनावश्यक सेवा वगळता इतर उद्योगधंदे, आॅफस, दुकाने सर्वकाही बंद आहे. गेला आठवडाभर एकूण एक मुंबईकर घरात बसला आहे. परिणामी एरवी दिसणारी रस्त्यावरची ट्राफिकही गायब झाली आहे. मुंबईचे रस्ते मोकळा श्वास घेऊ लागलेत. उद्योगधंदे बंद असल्याने, रस्त्यांवर गाड्याच नसल्याने प्रदूषणातही मोठी घट झाली आहे. 

सिस्टम ऑफ एयर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (safar) संस्थेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांनंतर मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारल्याचं म्हटलं आहे.

एअर क्वालिटी इंडेक्सनुसार मुंबईतील हवेची गुणवत्ता ० ते ५० अशा उत्तम श्रेणीत आली आहे. साधारणत: मार्च महिन्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत असते. एअर क्वालिटी इंडेक्सप्रमाणे हवेची गुणवत्ता ० ते ५० दरम्यान असल्यास उत्तम, ५० ते १०० दरम्यान असल्यास मध्यम आणि १०० ते १५० दरम्यान असल्यास वाईट समजली जाते.  

हेही वाचा- मुंबईच्या हवेचा गुणवत्ता स्तर उंचावला

सन २०१८-१९ च्या तुलनेत मार्च २०२० मध्ये मुंबईतील नायट्रोजन ऑक्साईडच्या पातळीत ४५ टक्क्यांनी घट झाली आहे. मुंबईतील सायन आणि कुर्ला हे भाग सर्वाधिक प्रदूषित मानले जातात. मात्र मागील ३० वर्षांत पहिल्यांदाच कुर्ला आणि सायनमधील हवेची गुणवत्ता चक्क उत्तम श्रेणीत आली आहे. 

मुंबईतलं हे लाॅकडाऊन येत्या १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. त्यानंतर हे लाॅकडाऊन वाढेल की नाही हे आताच सांगता येणार नाही, तोपर्यंत तरी मुंबईकरांना सुधारलेल्या हवेचा फायदा मिळेल हे नक्की.

संबंधित विषय