Advertisement

मुंबईकरांनो, लाटांशी उगाच खेळू नका!


मुंबईकरांनो, लाटांशी उगाच खेळू नका!
SHARES

कडाडणाऱ्या विजांचा आवाज सोबतच मुसळधार बरसणाऱ्या पावसाने मुंबईकरांना चांगलेच खूश करून टाकले आहे. जून महिन्याचे सलग तीन आठवडे घाम गाळत गेल्यानंतर रविवारी पावसाने दमदार हजेरी लावली. टपोरे थेंब अंगावर पडू लागताच मुंबईकरांची पावले वळली ती थेट समुद्रकिनाऱ्यांकडे. लाटांचे तुषार अंगावर झेलत, गरमागरम भुट्ट्यावर ताव मारत अनेकांनी आपला रविवार आेलेचिंब होतच सार्थकी लावला.


सुट्टीमुळे पावले वळाली चौपाट्यांकडे

सोमवारीही भुरूभुरू पडणाऱ्या पावसाने मुंबईकरांची आल्हाददायक सकाळ उगवली. बहुतेक सर्वच सरकारी आणि काही खासगी कार्यालयांना रमझान ईदची सुट्टी असल्याने बहुतांश मुंबईकर पुन्हा एकदा चौपट्यांवर गर्दी करू लागलेत. मात्र दुपारच्या सुमारास भरती असल्याकारणाने लाटांशी खेळण्यास इच्छुक मुंबईकरांना समुद्रात न उतरण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.सगळ्याच चौपट्यांवर होतेय गर्दी

अधूनमधून हलक्या सरींनी मुंबईकरांना भुलवत पुन्हा गडप होणाऱ्या पावसाने अखेर रविवारपासून दमदार पुनरागमन केले. मुंबईसह, ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार भागात जोरदार कोसळणाऱ्या या पावसाचा मनमुराद आनंदही सर्वांनी लुटला. सर्वत्र धुवाँधार कोसळल्यानंतर सोमवारी पावसाने थोडीफार उसंत घेतली आहे. रविवार आणि सोमवार सलग दोन दिवस सुट्टीचे असल्याने बहुतांश मुंबईकरांनी समुद्रकिनारी जाऊन धम्माल करण्याचा बेत आखला आहे. गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वरळी, बँडस्टॅण्ड, जुहू चौपाटी इत्यादी ठिकाणी मुंबईकरांची गर्दी होत आहे.दुपारी हायअलर्ट

पण पाऊस आणि सोबतच वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे लाटांचा जोरही वाढला आहे. त्यामुळे मजा-मस्ती करताना खोल समुद्रात उतरू नका, असा सल्ला, हवामान विभागाने दिला आहे. बहुतांश ठिकाणी उंच लाटा उसळत असून तसेच दुपारच्या सुमारास भरती असल्याने हाय अलर्टचा इशारा हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. त्यामुळे आजही पावसाच्या सरींचा अनुभव घ्यायला समुद्रकिनारी जाणार असलात, तर खोल समुद्रात उतरु नका, असे हवामान शास्त्र विभागाचे म्हणणे आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement