Advertisement

हॉर्न 'नॉट ओके' प्लीज...


हॉर्न 'नॉट ओके' प्लीज...
SHARES

आपण सगळे बहिरे होणार आहोत...ठार बहिरे...अगदी बरोबर वाचताय तुम्ही...आणि याला जबाबदारही आपणच असणार आहोत. होय... आपल्यामुळेच आपण बहिरे होणार आहोत. कसे काय? आपल्या अवतीभवती वाजणाऱ्या गाड्यांचे कर्कश्श्य हॉर्नचा कधी तुम्हाला त्रास होत नाही? मोठ्या आवाजात वाजणारे डॉल्बी, लाउडस्पीकर्स, सणासुदिला कानठळ्या बसवणारे फटाक्यांचे आवाज, इमारतीच्या बांधकामावर सतत वाजणाऱ्या ड्रीलिंग मशीन हे आवाज तुम्हाला बहिरे करण्यासाठी पुरेसे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? आणि फक्त कानच नाही तर तुमच्या आरोग्यावरही त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. उच्च रक्तदाब, रक्तवाहिन्यांचे विकार, मानसिक तणाव, निद्रानाश, हृदयाशी संबंधित आजार, चिडचिडेपणा, डोकेदुखी असे एक ना अनेक. डॉक्टरांच्या मते सर्वसाधारणपणे ५५ डेसिबल इतक्या मर्यादेपर्यंतचा आवाज माणूस सहन करु शकतो. याच्याहून अधिक डेसिबलचा आवाज आरोग्याला हानिकारक असतो.

"आपल्याकडे सर्वात जास्त प्रदूषण हे गाड्यांमुळे होतं. तुम्ही जास्त वेळ नॉइजी वातावरणात राहिलात तर तुमची ऐकण्याची क्षमता कमी होते. पण याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो. कमी ऐकू येणे किंवा हळूहळू ऐकण्याची क्षमता कमी होणे यासाठी आमच्याकडे आठवड्यात ४ ते ५ रुग्ण तर येतातच. त्यांची ऐकण्याची क्षमता कमी व्हायला ध्वनी प्रदूषणच जबाबदार असतं. मोठ्या आवाजाचा सर्वात जास्त परिणाम होतो तो ट्रॅफिक पोलिसांवर. कारण त्या वातावरणात ते जास्त वेळ असतात.” 

-डॉ.अतुल वायकोले

कल्पना करा की, तुम्ही रस्त्यावरून चालत आहात आणि कानठळ्या बसवणारे कर्कश्श्य हॉर्नचे आवाज येत आहेत. आपण चिडतो आणि हॉर्न वाजवणाऱ्यांना चार शब्द सुनावतो. अगदी त्यांची अक्कलही काढतो. बरं एकदा हॉर्न वाजवून त्यांचं समाधान होईल म्हणावं तर नाही. समोरची गाडी जागा करुन बाजूला होईपर्यंतही यांना धीर नसतो. त्यांना जायला जोपर्यंत तुम्ही रस्ता देत नाहीत तोपर्यंत त्यांचा हॉर्नवरचा हात हलतच नाही. मग हॉर्नच्या आवाजाला कंटाळूनच इतर लोकं गाड्या बाजूला घेत त्याला रस्ता देतात. आवश्यकता नसतानाही मोठ्याने हॉर्न वाजवले जातात. डोकं भणभणतं. हातात विमानच आल्याच्या आविर्भावात रस्त्यावरुन हॉर्न वाजवत सुसाट जाणारे तरुण तर आपण नेहमीच पाहिले असतील. इतर वाहनचालक आणि रस्त्यावर चालणारे त्यामुळे किती भांबावून जात असतील  याचा साधा विचारही केला जात नाही.

वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे किती त्रास होतो किंवा त्याचे किती वाईट परिणाम भोगावे लागू शकतात याचा अंदाजच मुळात मुंबईकरांना नाहीये. पण आता मुंबईकरांच्या भल्यासाठी 'आवाज' फाऊंडेशनसारख्या अनेक संघटनांनी पुढाकार घेतलाय. २६ एप्रिल हा 'इंटरनॅशनल नॉईज अवेअरनेस डे' म्हणून देशभर साजरा केला जातो. या अंतर्गत 'नो हॉन्किंग डे' तसेच 'आवाज बंद' अशा मोहिमा राबवण्यात येत आहेत. 'आवाज'फाऊंडेशनच्या संस्थापिका सुमायरा अब्दुलाली यांनी 'आवाज बंद' ही मोहीम सुरू केली आहे.


सोशल मीडियावर आम्ही 'आवाज बंद' हे कॅम्पेन सुरू केलं आहे. तुम्हाला आवाजाचा त्रास होत असेल तर तुम्ही तुमचा कानावर हात ठेवलेला फोटो आवाज फाऊंडेशनच्या पेजवर पोस्ट करू शकता. आमच्या या कॅम्पेनला ट्रॅफिक पोलिसांकडून आणि लोकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळतोय

-सुमायरा अब्दुलाली, अध्यक्षा, आवाज फाऊंडेशन

आवाज फाऊंडेशनने सुरू केलेल्या मोहिमेला मुंबईकरांचाही चांगला प्रतिसाद मिळतोय.

आपल्याकडे सायलेंट झोन घोषित केलेल्या परिसरात हॉर्न वाजवू नये असा नियम आहे. निवासी झोनमध्ये दिवसा जास्तीत जास्त ५५ आणि सायलेंट झोनमध्ये ५० डेसिबल आवाजाची पातळी राखणे आवश्यक आहे. तर रात्री निवासी झोनमध्ये जास्तीत जास्त ४५ आणि सायलेंट झोनमध्ये ४० डेसिबल आवाजाची क्षमता असणं आवश्यक आहे. मात्र सर्रासपणे नियम धाब्यावर बसवून त्यांचं उल्लंघन केलं जातं, हे सुमायरा अब्दुलाली यांनी केलेल्या सर्वेवरून समोर आलं आहे. सुमायरा अब्दुलाली यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजता मुंबईतल्या सहा महत्त्वाच्या रुग्णालयांबाहेरच्या आवाजाची क्षमता तपासली. तेव्हा समोर आलेलं वास्तव धक्कादायक होतं.

यामध्ये तुम्ही पाहू शकता की, माहिममधल्या हिंदुजा हॉस्पिटलबाहेर सर्वात जास्त म्हणजेच १००.५ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली आहे. तर वांद्रेतल्या लिलावती हॉस्पिटलबाहेर सर्वात कमी म्हणजेच ९५.१ डेसिबल आवाजाची नोंद करण्यात आली. सुमायरा अब्दुलाली यांनी यासंदर्भातील सर्व फोटो त्यांच्या फेसबुक पेजवर शेअर केले आहेत.


ध्वनी प्रदूषणामुळे सामान्यांना तर त्रास होतोच. पण सर्वात जास्त परिणाम होतो तो ट्रॅफिक पोलिसांवर. गाड्यांचे हॉर्न, सायरन आणि गाड्यांमधून निघणारा धूर यात ट्रॅफिक पोलीस जास्तवेळ राहतात. यासाठी आवाज फाऊंडेशनतर्फे १७ ट्रॅफिक कॉन्स्टेबलची कानांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ११ ट्रॅफिक कॉन्स्टेबलची ऐकण्याची क्षमता कमी झाल्याचं समोर आलं होतं. लोकांनी समजून घेणं महत्त्वाचं आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्यावर वारंवार किंवा गरज नसताना हॉर्न वाजवणं धोकादायक असू शकतं. लोकांनीही यासंदर्भात जागरुक राहणं गरजेचं आहे

-सुमायरा अब्दुलाली, अध्यक्षा, आवाज फाऊंडेशन


ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी हॉर्नच्या आवाजाच्या मर्यादेचे प्रमाण निश्चित करावे, असा आदेश राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला होता.

गणपती, दिवाळी आणि इतर सणाच्या काळात सर्वाधिक ध्वनी प्रदूषण होतं. पण मुंबईकरांची मानसिकता हळूहळू बदलतेय. त्यामुळे गेल्या २ वर्षात गणपती आणि दिवाळीत होणाऱ्या ध्वनी प्रदूषणात घट झाली आहे. ज्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या जास्त आहे तिथेच हॉर्न जास्त वाजवले जातात. ट्रॅफिक समस्या कमी झाली की ध्वनी प्रदूषणही कमी होईल. हायकोर्टाने निर्देश दिल्याप्रमाणे यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आम्ही सध्या रिव्यू करतोय. त्यानंतर जे मानदंड आहेत ते निश्चित करण्यात येतील. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डतर्फे स्पीकर आणि हॉर्नच्या संदर्भातील नियम निश्चित केले जातील. ते निश्चित झाले की त्याची अंमलबजावणी परिवहन खात्याकडून होईल. ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजला मानदंड दिले जातील. पण सध्या या संपूर्ण प्रक्रियेवर अभ्यास सुरू आहे 

संजय भुस्कुटे, जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ 

खरंतर हॉर्न न वाजवताही गाड्या चालवता येतात. पण आपल्याकडे ट्रॅफिकमध्ये उभं असलं तरी हॉर्न वाजवले जातात. दुसरं म्हणजे एसी कारमध्ये बसून, गाडीच्या काचा लावून आपण किती जोरात हॉर्न वाजवतो याचा अंदाज चालकाला अजिबात नसतो. कारण आत असल्यामुळे त्याला तो आवाज ऐकूच येत नाही. मात्र याचा त्रास इतरांना होतो. हॉर्न वाजवणाऱ्यांना याची कल्पनाही नसते की आपण आसपासची लहान मुलं, वृद्ध, पेशंट आणि एकूण सर्वच नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहोत. त्यामुळे असा खेळ जर तुम्हाला यापुढे दिसला तर अशा लोकांना एकच सांगा #awajniche

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा