Advertisement

नाले, खाड्यांमधील प्रदूषणाविरोधात वनशक्तीची ग्रीन ट्रिब्युनलकडे धाव


नाले, खाड्यांमधील प्रदूषणाविरोधात वनशक्तीची ग्रीन ट्रिब्युनलकडे धाव
SHARES

मुंबईतल्या खाड्या असोत वा नाले, सर्वत्र कचरा, घाण आणि दुर्गंधी असंच चित्र दिसतं. खाड्या आणि नाल्यांतील याच कचरा आणि घाणीमुळे समुद्राच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत आहे. असं असताना खाड्या-नाले साफ ठेवत समुद्र प्रदूषित होऊ नये, याची जबाबदारी असणाऱ्या महानगर पालिका आणि कांदळवण कक्षाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना दूरच, पण दररोज खाड्या आणि नाल्यांची सफाईही नीट होत नसल्याचं म्हणत वनशक्ती संघटनेने आता थेट राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे धाव घेतली आहे.



हरित न्यायाधिकरणाचे पालिकांना आदेश

मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील खाडी आणि नाल्यांची रोजच्या रोज साफसफाई व्हावी, नाल्यांना जाळ्या लावाव्यात आणि सांडपाण्यावर प्रक्रिया व्हावी, अशी मागणी करणारी याचिका वनशक्तीने नुकतीच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाखल केल्याची माहिती वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी 'मुंबई लाइव्ह'ला दिली. या याचिकेवर सोमवारी हरित न्यायाधिकरणात सुनावणी झाली असून एमएमआरमधील संबंधित पालिका, कांदळवण कक्ष आणि नगर विकास खात्याला यासंबंधीचं स्पष्टीकरण पुढील दोन आठवड्यात सादर करण्याचे आदेश हरित न्यायाधिकरणाने दिले आहेत.


४९ टक्केच सांडपाण्यावर प्रक्रिया

मुंबईचा विचार करता मुंबईत दररोज २४१६ लिटर सांडपाणी निर्माण होतं. पण त्यातील ४९ टक्केच सांडपाण्यावर प्रक्रिया होते. त्यामुळे ५१ टक्के सांडपाणी तसंच समुद्रात जात असून त्यामुळे समुद्रातील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. 'या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करणं पर्यावरणाच्या दृष्टीने महागात पडेल', अशी भूमिका घेत वनशक्तीने संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रियेची मागणी केली आहे. तसेच नाल्यांना जाळ्या लावण्याचीही मागणी केली आहे. वनशक्तीच्या या मागणीवर आता हरित न्यायाधिकरण काय निर्णय देते आणि त्याअनुषंगानं खाड्या-नाले स्वच्छ होऊन समुद्रातील प्रदूषण रोखलं जातं का? हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा