सध्याच्या डिजिटल युगात वेगवेगळे छंद जोपासणारे अनेक अवलिया आपण पाहिले असतीलच. अगदी लहान मुलांपासून वयोवृद्धांमध्ये आजही बसची जुनी तिकिटे, जुनी नाणी, वर्तमान पत्र, वर्तमान पत्रांची कात्रणे सांभाळून ठेवण्याचा छंद असतो. पण याच छंदामुळे जगण्याची प्रेरणा आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक झाला तर? तुम्ही म्हणाल हे कसे? कारण याचाच प्रत्यय मुलुंडमधील महाराष्ट्र सेवा संघ येथे पार पडलेल्या 'छंद माझा वेगळा' या अनोख्या प्रदर्शनामध्ये आला! जवळपास ३५ छंदकरींनी या प्रदर्शनात सहभाग घेतला होता.
कागदापासून तयार केलेली फुले, कागदी फर्निचर, नारळाच्या करवंटीपासून तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू या प्रदर्शनात प्रेक्षकांची गर्दी खेचत होत्या. आपल्या आयुष्याच्या संध्याकाळी देखील आपलं मन या विविध छंदांमध्ये गुंतवून नव्या उमेदीने आयुष्य जगता येते हे ८० वर्षांच्या मालती मेहेंदळे या आजींनी सिद्ध करून दाखवलं आहे. त्यांनी अगदी खरी वाटावी, अशी कागदी फुले तयार करून प्रदर्शनात मांडली होती.
आयुष्याच्या संध्याकाळी छंद आपल्याला तितकाच निर्मळ आनंद देतो. आनंदाने जगण्याची नवी उमेद निर्माण करतो.
मालती मेहेंदळे, छंदकार
कित्येकदा हेच छंद आपल्याला आनंद देता देता आपल्या ज्ञानात देखील भर पाडतात. अगदी कित्येक वर्षांपूर्वीचे वर्तमान पत्र किंवा त्याची कात्रणे, जुने संदर्भ आणि जुन्या आठवणी ताज्या करतात. पेशाने शिक्षिका असलेल्या नीता यांनी १९९६ पासूनची वर्तमानपत्रातील काही कात्रणे जपून ठेवली आहेत.
मोबाईलच्या या जगात आताच्या पिढीचे वाचन कमी झाले आहे. तेव्हा अशी कात्रणे त्यांना मार्गदर्शक ठरावीत, असे मला वाटते.
नीता सावंत, छंदकार
या मंडळींची कलाकुसर आणि त्याबद्दलची ओढ पाहून खरंच भारावून जायला होतं. यांच्याकडून प्रेरणेसोबतच सकारात्मक दृष्टिकोनही आपल्याला मिळतो.
प्रणिता शिपूरकर, मुंबईकर
छंद आणि त्यामुळे मिळणारा निखळ आनंद हा कित्येकदा करिअर म्हणून देखील आयुष्यात मार्गदर्शक ठरतो. याकडे आता व्यवसाय म्हणून देखील पावलं पडत आहेत. यामुळे अशा प्रदर्शनातून छंदकारांसोबतच प्रेक्षक देखील सुखावून जात आहेत.
सध्याच्या डिजीटल युगात छंद जोपासणे अत्यंत गरजेचे आहे. छंद हा हृदयाचा मनाशी, असा अतिशय प्रामाणिक संबंध जोडतो. लोक आपल्या छंदाबाबत भरभरून बोलत असतात. म्हणून आपल्या सगळ्यांच्या हृदयातील छंद हा जास्तीत जास्त वाढवावा, लहान मुलांच्या मनात तो वाढत जावा, म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.
आनंद भावे, आयोजक