Advertisement

पश्चिम महाराष्ट्राची मुलगी बनली विदर्भाची 'राजकन्या'

सोनी मराठी वाहिनीवर 'एक होती राजकन्या' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची निर्मिती असलेल्या या मालिकेत वडील आणि मुलीची गोष्ट आहे. या मालिकेत अभिनेत्री किरण ढाणेचा पोलिसी खाक्या पाहायला मिळेल.

पश्चिम महाराष्ट्राची मुलगी बनली विदर्भाची 'राजकन्या'
SHARES

नेहमीपेक्षा वेगळ्या कथानकावर आधारित मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात आणि लोकप्रिय होतात. अशीच एक नवीन मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एक सर्वसामान्य मुलगी विदर्भाची 'राजकन्या' बनली आहे.


पोलिसी खाक्या

सोनी मराठी वाहिनीवर 'एक होती राजकन्या' ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. महेश कोठारे आणि आदिनाथ कोठारे यांच्या कोठारे व्हिजनची निर्मिती असलेल्या या मालिकेत वडील आणि मुलीची गोष्ट आहे. या मालिकेत अभिनेत्री किरण ढाणेचा पोलिसी खाक्या पाहायला मिळेल. किशोर कदम यांनी या मालिकेत किरणच्या वडीलांची भूमिका साकारली आहे. 'मुंबई लाइव्ह'शी एक्सक्लुझीव्ह संवाद साधताना किरणनं वडीलांचं स्वप्न साकार करण्यासाठी पोलिसमध्ये भर्ती झालेल्या या तरुणीबाबत विस्तृतपणं सांगितलं.


आव्हानात्मक भूमिका

मूळची साताऱ्याची असलेल्या किरणचं शिक्षणही तिथेच झालं आहे. किरण आता 'एक होती राजकन्या' या मालिकेत विदर्भातील तरुणीची भूमिका साकारत आहे. याबाबत ती म्हणाली की, मी पश्चिम महाराष्ट्रातील असल्यानं मालिकेत विदर्भातील भूमिका साकारणं आव्हानात्मक होतं. या मालिकेतील अवनीचा प्रवास खूप अवघड होता. गणेशसरांमुळं तो खूप सोपा झाला. ते विदर्भातील असल्यानं प्रॅापर उच्चार आणि बोलीभाषेचा लहेजा समजून घेण्यासाठी त्यांची खूप मदत होत आहे.


कुटुंबाची जबाबदारी

या मालिकेतील अवनीला डॅाक्टर बनायचं असतं, पण नियतीमुळं तिला खाकी परिधान करावी लागते. याबाबत किरणनं सांगितलं की, अवनीला डॅाक्टर व्हायचं आहे, पण बाबांच्या अचानक जाण्यानं कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी तिच्या खांद्यावर येते. त्यामुळं बाबांच्या ठिकाणी ती अनुकंपा तत्त्वावर जॅाइन होते. अवनीनं मूळात मेडीकलचं शिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळं मी मेडीकलचं बेसिक नॅालेज जमा करायचाही प्रयत्न केला. यासाठी काही डॅाक्टरांनाही भेटले. पोलिसाच्या भूमिकेसाठी पोलिस अधिकाऱ्यांच्याही गाठीभेटी घेतल्या.


महेश कोठारेंकडून कानमंत्र

निर्माते कोठारे अॅन्ड सन्स यांनीही यापूर्वी पोलिसांच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळं त्यांच्याकडूनही किरणला कानमंत्र मिळाला आहे. यााबाबत किरण म्हणाली की, महेश कोठारे सर आणि आदिनाथ कोठारे कायम सेटवर अव्हेलेबल असतात. त्यांनी आजवर बऱ्याच भूमिका साकारल्या आहेत. महेशजींनी साकारलेली इन्स्पेक्टर महेश जाधव ही व्यक्तिरेखा अफलातून लोकप्रिय आहे. आदिनाथनं '१०० डेज'मध्ये साकारलेला पोलिस अधिकारीही गाजला होता. त्यामुळं त्यांच्याकडूनही थोड्या फार टिप्स मिळाल्या.


अभिनयाची गोडी लागली

किरणला फिल्मी पार्श्वभूमी नाही. तिची आई गृहिणी, तर वडील काऊंन्सिलर आहेत. भविष्यात नेमकं काय बनायचं हेसुद्धा तिनं पक्कं ठरवलेलं नव्हतं, याबाबत ती म्हणाली की, मी योगायोगानं अभिनयात आले. युथ फेस्टिव्हलसाठी मुलं गोळा करून आणावी लागतात. त्यांच्यासोबत मीसुद्धा आले होते. संधी मिळाली आणि मी चांगलं काम केलं. त्यामुळं उत्साह वाढला आणि अभिनयाची गोडी लागली. मी कधीच अमूक एक बनायचं ठरवलं नव्हतं. आज डॅाक्टर, उद्या पोलिस, तर परवा एअर होस्टेस बनावं असं वाटायचं. त्यामुळं कोणीतरी गंमतीत म्हटलं होतं की, तू अॅक्टिंग कर म्हणजे तुला सर्व बनता येईल. अखेर तेच खरं झालं.


हुषार आणि कॅान्फिडन्टही

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांना डोळ्यांसमोर ठेवून आपण ही भूमिका साकारत असल्याचं किरण मानते. अवनीच्या स्वभाव वैशिष्ट्याबाबत किरण म्हणाली की, ही स्वप्नाळू आहे. स्वप्नांच्या दुनियेत जगत असते. बाबांच्या सेफ झोनमध्ये असते, पण बाबांच्या जाण्यामुळे तिच्यावर खूप जबाबदाऱ्या आल्या आहेत. ती इनोसंट, भोळी असली तरी हुषार आणि कॅान्फिडन्टही आहे.


पळशीची पीटी

किरणनं यापूर्वी 'पळशीची पीटी' या सिनेमात एका रनरची भूमिका साकारली आहे. या सिनेमानं बरेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गाजवले आहेत. यातील मुख्य भूमिकेसाठी किरणला पुरस्कारही मिळाले आहेत. याशिवाय 'लागी रं झालं जी' या मालिकेत तिनं जयश्री ही निगेटीव्ह भूमिका साकारली आहे. आज किरणकडे बऱ्याच सिनेमांच्या अॅाफर्स आहेत, पण ती सध्या 'एक होती राजकन्या' या मालिकेवरच लक्ष केंद्रित करत आहे.



हेही वाचा -

शिवसेना म्हणजे आयत्या बिळावर नागोबा : नितीन सरदेसाई

नीरव मोदीचा आलिशान बंगला डायनामाईटने उडवणार!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा