Advertisement

खजुराने वाढवली रमजानची गोडी


SHARES

रमजानमधला उत्साह अनुभवला तो मुंबईतल्या मोहम्मद अली रोडवर. सजलेली दुकानं, खाण्यापिण्याची रेलचेल आणि प्रचंड गर्दी... मोहम्मद अली रोड वर दरवर्षी हेच चित्र पाहायला मिळतं. 'रमजान'मध्ये महिनाभर रोजे म्हणजेच उपवास असल्यानं सुका मेवा, रबडी, खजूर आणि फळं यांची चांगलीच रेलचेल असते. 'रमजान'निमित्त सजलेल्या या बाजारपेठांमध्ये खाद्यपदार्थांसोबतच मुख्यतः वेगवेगळ्या प्रकारचे खजूर सर्वांचं आकर्षण ठरले आहेत. चवीला गोड आणि शरीरासाठी आरोग्यदायी असा हा खजूर रमजानमध्ये खाणं हे शुभ मानलं जातं.

खजुराचे इतके प्रकार असतात हे मी पहिल्यांदाच पाहिले होते. माझ्या माहितीत फक्त खजुराचे दोनच प्रकार होते आणि ते म्हणजे काळे आणि ब्राऊन खजूर. पण मोहम्मद अली रोड आणि अंधेरी इथल्या बाजारत फेरफटका मारल्यानंतर मात्र खजुराचे २५-३൦ प्रकार समजले. अंबर, कलमी, रोतब, भूमी, पिंड, जायदी, छुहारा (सुलेमानी खजूर) असे अनेक प्रकार बाजारात विकण्यासाठी आले आहेत. हे खजूर सौदी, अरेबिया, तुर्की, जॉर्डन, इजिप्त, इराण, इराक या देशातून मुंबईतल्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. गुणवत्तेनुसार त्यांच्या किंमतीत फरक आहे.

खजूर गल्फ कंट्रीतून येतो. भारतात खजूर बनतच नाही. भारतात इराणचे खजूर जास्त विकले जात आहेत. पाच-पाच किलोच्या पॅकिंगमध्ये इराणचा खजूर येतो. या इराणी खजुरांची किंमत ८൦ रुपयांपासून ते २५൦ रुपये किलोच्या घरात आहे.

सुरेशकुमार ठक्कर, विक्रेता, मोहम्मद अली रोड

अरब देशातून येणारा ५-६ टन खजुराचा माल वाशीच्या एपीएमसी बाजारात उतरवला जातो. त्यानंतर या बाजारातून पूर्ण मुंबईत खजूर विक्रीसाठी पाठवला जातो.

अनेक वर्षांपासून खजूरच्या बिझनेसमध्ये आहे. होलसेलमध्ये मी खजूर विकतो. सौदी, इराण आणि दुबई येथून खजूर जास्त येतो. अज्वा खजूर हा जास्त विकला जातोय. खजुरासोबतच अज्वा सिज पावडर आणि सिरपही आहे, जे की फक्त दुधात मिक्स करुन तुम्ही घेऊ शकता. फॅन्सीमध्ये कॅरेमल खजूर, ऑरेंज प्लेवर खजूर, बदाम आणि मधाचा फ्लेवर असलेले खजूर, चॉकलेट, रोज फ्लेवर खजूर असे अनेक प्रकार आहेत.

रितेश ठक्कर, बेस्ट इंटरप्राइजेस, वाशी

साधारणत: दीडशे रुपये किलोपासून खजुराचे भाव सुरू होतात. सर्वात महागडा खडूर साधारण दोन ते अडीच हजार रुपये किलोपर्यंत असतो. सर्वात महागडा खजूर अज्वा जातीचा आहे. तो फक्त सौदीमध्येच तयार होतो. या खजुराचं धार्मिक महत्त्वही जास्त आहे. मोहम्मद पैगंबरांनी स्वत:च्या हातानं या खजुराचं झाड लावलं होत, अशी वदंता आहे. या खजुराची बीसुद्धा टाकून देत नाहीत. त्यामुळे फक्त रमजानमध्येच नाही, तर १२ महिने अज्वा खजूरला जास्त मागणी असते.

माझे जवळचे मित्र हे मुस्लिम बांधव आहेत. त्यांना दरवर्षी मी खजूर भेट म्हणून देतो. खजूर हे त्यांच्यात खूप शुभ मानलं जातं. खजूर खाऊनच ते उपवास सोडतात. त्यामुळे त्याचं खूप महत्त्व आहे. किमया खजूर हा खूप छान आहे. त्यामुळे मी तोच खजूर देण्याला प्राधान्य देतो.

योगेश दोडके, पहेलवान, हिंद केसरी

खजुरात 'अ', 'ब' आणि 'क' जीवनसत्व अधिक प्रमाणात असतं. शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्याचं काम खजूर करतो. जिथे पाण्याची कमतरता असते, त्या प्रदेशात खजूर जास्त खाल्ला जातो. म्हणून मध्य पूर्वेच्या देशांमध्ये आहारात खजुराचा समावेश असतो. तसंच कार्बोहायड्रेट्सही त्यातून मिळतात. खजुरात ६०-७० टक्के इतकी साखर असते. त्यात चुना, कॅल्शियम आणि तांबं यांचं प्रमाण अधिक असतं. खजुरामुळे आतड्यांची स्वच्छता होते. त्यामुळे खजुराला पौष्टिक समजलं जातं. फक्त उपवासादरम्यान खजुराचं सेवन न करता रोजच्या खाण्यातही खजुराचा समावेश असणं आवश्यक आहे. दिवसाला दोन खजूर खाणे हे शरीरासाठी लाभदायी ठरू शकते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा