Advertisement

जाणून घ्या होळीचे पौराणिक महत्त्व

होळी, रंगपंचमी हा सण उत्साह आणि आनंदाचा तर आहेच. शिवाय होळी साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे.

जाणून घ्या होळीचे पौराणिक महत्त्व
SHARES

वसंताच्या आगमनाची चाहूल लागतानाच साजरा होणारा होळीचा सण त्यापैकीच एक. होलिका दहन, धूळवड आणि रंगपंचमी अशा तीन दिवसांत होळीचा सण साजरा केला जातो. होळी हा सण उत्साह आणि आनंदाचा तर आहेच. शिवाय होळी साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे.

मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीनं पोषक वातावरणाची निर्मिती करतो. त्यामुळे होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार यावर्षी होळी दहन २० मार्चच्या रात्री १ तास ७ मिनिटांच्या काळात करणं हितावह आहे. रात्री ११.२८ ते १२.३५ या काळात होळी साजरी केली जाईल.


अशी साजरी करावी होळी

देशभरामध्ये होळी हा सण विविध नावानं ओळखला जातो. कोकणात होळीच्या दिवसापासून पुढील ८ ते १५ दिवस शिमगोत्सव साजरा केला जातो. सूर्यास्तानंतर होलिका प्रदीपन करून हुताशनी पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा आहे. ही एक प्रकारची अग्निपूजाच आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक होळी साजरी करताना झाडांची छाटणी करण्यापेक्षा पानगळ झालेली पानं, काट्या कुट्या एकत्र करून होळी साजरी करणं हितावह आहे. होळीची शास्त्रोत्र पूजा करून ती पेटवली जाते. त्याभोवती फिरून बोंबा मारल्या जातात.


पौराणिक कथा

१) भगवान श्रीकृष्ण लहान असताना त्याला ठार मारण्यासाठी कंसानं पुतना राक्षसीणीला पाठवले. ती विषारी दूध पाजीत असतानाच तिचा प्राण शोषून कृष्णाने दुष्ट पुतना राक्षसीणीला यमसदनाला पाठवलं. या पुतना राक्षसीणीला होळीच्या दिवशी रात्रीच्यावेळी जाळण्यात येतं. 

२) पुराणातील गोष्टीप्रमाणे पूर्वी ढुंढा नावाची एक दुष्ट राक्षसीण लहान मुलांना पीडा देत असे. तेव्हा तिला शिव्या देऊन ठिकठिकाणी अग्नी पेटवून हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. होळी पेटवून होलिकोत्सव साजरा केला म्हणजे गावातील मुलांना ढुंढा राक्षसीण त्रास देत नाही असा समज आहे.


बोंबा का मारल्या जातात?

होलिका दहनाच्या दिवशी ढुंढा राक्षसीला म्हणजे अस्वच्छतेला शिव्या दिल्या जातात. मनातील विकृत भावनांचा निचरा केला जातो. त्यामुळे बोंबा मारल्या जातात. आपल्या सण आणि संस्कृतीमध्येच काही छुपे गूढ अर्थ लपले आहेत. त्यामुळे काही बिभत्स कृत्य करण्यापेक्षा त्याचा अर्थ आणि त्यामागील संकल्पना जाणून सण साजरा केल्यास तो अधिक आनंददायी ठरेल.



हेही वाचा -

होळी आणि रंगपंचमीसाठी घरच्या घरी बनवा नैसर्गिक रंग




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा