कोरोनाबाधित रुग्णांची संख्या राज्यात वाढत असताना या रुग्णांना लागणाऱ्या आॅक्सिजनची मागणी देखील वाढत आहे. अशा स्थितीत आॅक्सिजनची कमतरता भासू नये याकरीता आॅक्सिजन पुरवठादार कंपन्यांनावर राज्य सरकारकडून काही बंधने टाकण्यात आलेली आहेत. त्यानुसार या कंपन्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के आॅक्सिजनचा पुरवठा करणं बंधनकारक असणार आहे. (80 percent oxygen supply for medical field mandatory to manufacturer companies in maharashtra)
साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर करीत वैद्यकीय प्राणवायू उत्पादन करणाऱ्यांना वैद्यकीय क्षेत्रासाठी ८० टक्के आणि उद्योगांसाठी २० टक्के प्राणवायू देण्याचं बंधनकारक करण्यात आलं आहे. याची अंमलबजावणी डिसेंबर २०२० पर्यंत राज्यात लागू राहणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
यापूर्वी उद्योग क्षेत्रासाठी ५० ते ६० टक्के आणि वैद्यकीय क्षेत्रासाठी ४० ते ५० टक्के प्राणवायूचा पुरवठा केला जायचा. आता मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यात कायद्यान्वये बदल करून पुरवठ्याचे प्रमाण ८० टक्के वैद्यकीय क्षेत्रासाठी तर २० टक्के उद्योगांसाठी असं करण्यात आलं आहे. यामुळे रुग्णांना प्राणवायूची कमतरता भासणार नाही, अशी दक्षता घेण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
हेही वाचा - मुंबईतल्या 'या' रुग्णालयातला आॅक्सिजनचा पुरवठा वाढवला
दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांच्या संख्येत रविवार ६ सप्टेंबर रोजी लक्षणीय वाढ झाली. आतापर्यंतची ही सर्वोच्च वाढ असल्याचं आरोग्य विभागातून दिलेल्या माहितीतून स्पष्ट होतं. राज्यात रविवारी दिवसभरात तब्बल २३,३५० नवे रुग्ण सापडले आहेत. महाराष्ट्र अनलॉक ४ आता वेगाने कार्यरत आहे. त्यामुळे अपवाद वगळता सर्व दुकाने, सेवा, जनजीन पूर्वपदावर येत असल्याचे चित्र असतानाच कोरोना संकट पुन्हा एकदा उग्र रुप धारण करताना दिसत आहे.
राज्यात अनलॉक ४ ला सुरवात झाली असताना, दिवसभरात कोरोनाचे २३ हजार ३५० नवे रुग्ण सापल्याने आरोग्य विभागाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. तर दिवसभरात ३२८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. एकाच वेळी नोंदल्या गेलेल्या एवढ्या मोठ्या संख्येमुळे राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या आता ९,०७,२१२ इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या ६,४४,४०० जणांचा आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या २६६०४ जणांचाही समावेश आहे. तसेच, एकूण संख्येत ( ९,०७,२१२) राज्यात विद्यमान स्थिती प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या २,३५,८५७ रुग्णांचाही समावेश आहे.