मुंबईतील सायन रुग्णालयात भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सीन’ या स्वदेशी निर्मितीच्या कोरोना लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्यात येणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव रुग्णालयाच्या एथिक्स समितीकडं पाठविण्यात आला असून, मंजुरी मिळाल्यानंतर चाचण्या सुरू होणार आहेत.
मुंबईत या लशीच्या चाचण्या प्रथमच होत आहेत. मुंबईत सध्या ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोविशील्ड’ या लशीच्या चाचण्या मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात सुरू आहेत. या चाचण्या दुसऱ्या टप्प्यात आल्या असून या महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
मुंबईत या चाचण्या करण्यासाठी लोकमान्य टिळक रुग्णालयाला मान्यता मिळाली आहे. एथिस्क समितीकडे प्रस्ताव सादर केला असून या आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्वयंसेवकांची नोंदणी सुरू होणार आहे. लस टोचण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जवळपास २ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सुरुवातीला ५०० ते १ हजार स्वयंसेवकांवर चाचण्या करण्याचं प्रस्तावित असल्याचं समजतं.
भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) यांच्या संयुक्त विद्यमानं स्वदेशी निर्मित केलेल्या कोव्हॅक्सीन या लशीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना परवानगी दिली आहे. देशभरात दिल्ली, मुंबई, लखनऊ, पटना यांसह १० राज्यांत २१ ठिकाणी २८ हजार ५०० जणांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत.
लशीसाठीचे निकष
१८ ते ६० वर्षांमधील ज्यांना आतापर्यंत करोनाची बाधा झालेली नाही. इम्युनोसप्रेस औषधे घेत नाहीत आणि मधुमेह, उच्च रक्तदाब असे अन्य कोणतेही दीर्घ आजार नाहीत.