
मुंबई वाहतूक पोलिसांनी बुधवारी साकीनाका ट्रॅफिक विभागात वाहतूक बदलांची घोषणा केली आहे. जोगेश्वरी–विक्रोळी लिंक रोड (JVLR) वरील मिलिंदनगर आणि गणेशघाट सेल्फी पॉइंटदरम्यान सुरू असलेल्या मेट्रो लाईन 6 कामामुळे हे बदल करण्यात आले आहेत.
ही वाहतूक व्यवस्था 5 नोव्हेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत लागू असेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
पूर्व उपनगर वाहतूक विभागाचे उपायुक्त प्रदीप चव्हाण यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, ईगल इन्फ्रा इंडिया लिमिटेड तर्फे सुरू असलेल्या ‘एलिमेंट्स लॉन्चिंग’ कामासाठी हा बदल आवश्यक आहे. वाहतूक सुरळीत राहावी आणि नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तात्पुरती वाहतूक बंदी आणि पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.
JVLR वरील L&T फ्लायओव्हरच्या उत्तर दिशेच्या सर्विस रोडचा A. M. Naik Tower Road ते साकी विहार रोड हा भाग या कालावधीत पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद राहील.
वाहने गणेशघाट सेल्फी पॉइंट (JVLR नॉर्थबाउंड) येथून रांबाग ब्रिजखाली जाऊन, यू-टर्न घेऊन पुन्हा गणेशघाट सेल्फी पॉइंट साऊथबाउंड मार्गे पवई जंक्शन व साकी विहार रोडकडे वळवण्यात येतील.
मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि सहकार्य करावे.
मुंबई पोलिसांनी मंगळवारी भांडुप–सोनापूर (जीएमएलआर) मार्गावरून जाणाऱ्या वाहतुकीसाठीदेखील मेट्रो 4 कामांमुळे निर्बंध जाहीर केले.22 सप्टेंबर रोजी ठाण्यात मेट्रो लाईन 4 च्या 10 किमीच्या पहिल्या ट्रायल रनला यश मिळाले होते, जे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.
वाहतूक सूचनेत सांगण्यात आले आहे की, एलबीएस रोडवरील GMLR (भांडुप-सोनापूर) जंक्शन येथे मेट्रो लाईन 4 साठी काम सुरू असून, 56 मीटर लांबीचा स्टील स्पॅन दोन टप्प्यांत बसवला जाणार आहे. यासाठी क्रेन्स, मल्टिआक्सल ट्रेलर्स आणि इतर जड यंत्रसामग्रीची गरज असेल.
खालील तारखांना रस्ता बंद राहील:
1 नोव्हेंबर 2025: रात्री 10 ते पुढील दिवशी सकाळी 10
2 नोव्हेंबर 2025: रात्री 10 ते पुढील दिवशी सकाळी 7
काम पूर्ण न झाल्यास 8 आणि 9 नोव्हेंबर 2025 रोजी त्याच वेळेत रस्ते बंद राहतील.
तसेच 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान एलबीएस रोडवरील जंक्शनवर एक लेन आवश्यकता भासल्यास बंद ठेवण्यात येईल.
नागरिकांनी या कालावधीत पर्यायी रस्त्यांचा वापर करून सहकार्य करावे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा
