सर्दी-खोकल्याची औषधं आता मेडीकल स्टोअर्सव्यतिरिक्त 'इथं'ही मिळणार

ताप-सर्दी, खोकला-अंगदुखीसारखी, डाॅक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारी औषधं अर्थात ओव्हर द काऊंटर (ओटीसी) औषध मेडीकल स्टोअर्सव्यतिरिक्त अन्य ठिकाणी देखील मिळणार आहेत. सुपर मार्केट, माॅल, रेल्वे स्थानक, पेट्रोलपंप आणि किरणा दुकानांवर ओटीसीमध्ये समाविष्ट असलेली औषधं आता सहज मिळणार असून याबाबतचा निर्णय नुकताच केंद्र सरकारनं घेतला आहे.

सर्दी-खोकल्याची औषधं आता मेडीकल स्टोअर्सव्यतिरिक्त 'इथं'ही मिळणार
SHARES

सर्दी-ताप, खोकला वा अंगदुखीसारख्या आजारांसाठी डाॅक्टरकडे जाणं अनेकजण टाळतात. मग हा साधा आजार असल्याचं म्हणत मेडीकल स्टोअर्सवर जाऊन सर्दी-खोकला, ताप-अंगदुखीची एखादी चांगली गोळी द्या असं म्हणत आपण मेडीकल स्टोअर्समधून गोळी घेऊन येतो. या औषधांसाठी डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची गरज लागत नसल्यानं ही औषधं सहज मिळतात. पण ही औषध केवळ मेडीकल स्टोअर्समध्येच मिळतात. मात्र, आता ताप-सर्दी, खोकला-अंगदुखीसारखी, डाॅक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारी औषधं अर्थात ओव्हर द काऊंटर (ओटीसी) औषध मेडीकल स्टोअर्सव्यतिरिक्त अन्य ठिकाणी देखील मिळणार आहेत. सुपर मार्केट, माॅल, रेल्वे स्थानक, पेट्रोलपंप आणि किरणा दुकानांवर ओटीसीमध्ये समाविष्ट असलेली औषधं आता सहज मिळणार असून याबाबतचा निर्णय नुकताच केंद्र सरकारनं घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य रूग्णांना मोठा दिलासा मिळणार असला तरी औषध विक्री व्यवसायिक आणि फार्मासिस्टकडून मात्र याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. कारण काहींच्या मते यामुळे औषध विक्री व्यवसायाला फटका बसेल तर काहींच्या मते हा निर्णय रूग्णांच्यादृष्टीनं योग्य आहे.


औषध विक्रीस आधी होती बंदी

पॅरासिटाॅमाल इब्रूफेन एंटासीड, रैंटाडीन, पेंटाप्रोजाॅल, डाईजीन, वोवरान, क्वार्डीडर्म, ब्रोजोडेतक्ससह अन्य काही औषधांचा ओटीसी औषधांच्या यादीत समावेश आहेत. ही औषध अशी आहेत की ती डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय मेडीकल स्टोअर्स चालकांना विकता येतात. मात्र या औषधांची विक्री केवळ आणि केवळ मेडीकल स्टोअर्समध्येच होते. काही वर्षांपूर्वी ही औषधं किराणा दुकान वा पानटपऱ्यांवर मिळत होती. मात्र या औषधांचा गैरवापर टाळण्यासाठी तसंच औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्याच्या कडक अंमलबजावणीच्यादृष्टीनं अर्थात औषधांची विक्री ही फार्मासिस्टच्या उपस्थितीत आणि डाॅक्टरांच्या सल्ल्यानंच व्हावी या कायद्याच्या कडक अंमलबजावणीच्यादृष्टीनं किरणा दुकान वा इतरत्र ओटीसीमधील औषध विकण्यास बंदी घालण्यात आली.


औषधांची संज्ञा बदलणार

आता मात्र ओटीसीमधील औषध पुन्हा एकदा किराणा दुकानांसह माॅल, सुपर माॅल, पेट्रोलपंप आणि रेल्वे स्थानकांवर उपलब्ध होणार आहेत. सरकारनं ओटीसी औषधांची संज्ञा बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या औषधांचा डोस, लेबलिंग आणि पॅकिंग आणि  गोळ्यांची संख्या यात बदल करण्यात येणार आहेत. ओटीसीमधील गोळ्या या एक वा दोन अशाच संख्येत घेतल्या जातात. अशावेळी १० ते १५ गोळ्यांची स्ट्रीप असते. त्यामुळे विक्रेत्यांकडून एक-दोन गोळ्या देण्यास टाळाटाळ होते. त्यामुळे रूग्णाला हव्या तितक्याच गोळ्या मिळाव्यात यासाठी तीन ते आठ गोळ्यांची स्ट्रीपही यापुढं उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


किराणा दुकानांसह इथंही मिळणार औषधं

केंद्राच्या या निर्णयानुसार लवकरच सर्दी-ताप, खोकल्याची औषधं किराणा दुकानांसह अन्य ठिकाणी उपलब्ध होणरा असून त्यामुळे रूग्णांना दिलासा मिळणार आहे. मात्र त्याचवेळी या हा निर्णय केवळ औषध कंपन्यांच्या फायद्यासाठी घेतल्याचं म्हणत महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट संघटनेनं या निर्णयाला विरोध केला आहे. तर ही औषधं कुठंही मिळू लागल्याचा त्याचा औषध विक्री व्यवसायावर परिणाम होईल असं मत संघटनेचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे या निर्णयाला असलेला विरोध केंद्राकडे कळवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही फार्मासिस्टकडून मात्र या निर्णयाचं स्वागत होत आहे. ही औषध ओटीसी असल्यानं या औषधांचा कुठंही गैरवापर होणार नाही. महत्त्वाचं म्हणजे ही औषध सहज आणि कुठंही रूग्णांना त्वरीत उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे रूग्णांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब असल्याचं काही फार्मासिस्टचं म्हणणं आहे.हेही वाचा -

कामगार नेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचं निधन

पालिकेच्या चार हजार आरोग्य सेविकांचा बेमुदत संपसंबंधित विषय