Advertisement

दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट

राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या बाधित रुग्णांची संख्या ४ हजारांहून कमी आढळत असल्याचं चित्र आहे.

दिलासादायक! राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट
SHARES

साथीचे आजार व कोरोना या दुहेरी संकटामुळं नागरिकांना मोठा मनस्थाप सहन करावा लागतो आहे. मात्र अशा परिस्थितीत राज्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ती म्हणजे गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या बाधित रुग्णांची संख्या ४ हजारांहून कमी आढळत असल्याचं चित्र आहे. गुरुवारी ही राज्यात ३ हजार ५९५ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात ३,२४० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत एकूण ६३,२०,३१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०६ टक्के एवढं झालं आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. राज्यात गुरुवारी ४५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,६५,२९,८८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,११,५२५(११.५२टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्या राज्यात २,८९,४२५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर १,९०८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील नव्या कोरोना रुग्णांचा आलेख ढासळलेला असला तरीही सण-उत्सवांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात हालचाल झाली आहे. अनेकजण गणेशोत्सवासाठी शहरातून गावाकडे गेले आहेत.

या पार्श्वभूमीवर करोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. काही जिल्ह्यांमध्ये उत्सव काळात जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा