राज्यातील कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची त्रिस्तरीय वर्गवारी करण्यात आली आहे. कोरोनाबाधितांच्या लक्षणांनुसार यांतील वेगवेगळ्या रुग्णालयांत रुग्णांवर उपचार करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी केल्याची माहिती टोपे यांनी दिली.
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी आरोग्य सेतू अॅप सगळ्यांनी डाऊनलोड करावं अशी आग्रही भूमिका मांडली. या अॅपच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती मिळण्यासोबतच एखाद्या रुग्णाला शोधून काढणंही प्रशासनाला सोपं होईल, असंही टोपे म्हणाले.
महाराष्ट्रात आतापर्यंत देशातील सर्वाधिक ३३ हजार कोविड-१९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १६५२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एकट्या मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यातील १ हजार जण रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना लक्षणे नसून २५ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर ५ टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.
महाराष्ट्रातील चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णांची संख्याही वाढत आहे. तसंच रुग्ण समोरुन येण्याची वाट न बघता महापालिका आता घरोघरी जाऊन चाचण्या करत आहे. केंद्र सरकारला सांगून आपण आणखी ५ चाचणी केंद्र येत्या २ ते ३ दिवसांत सुरू करत आहोत. यामुळे राज्यातील कोविड-१९ चाचणी केंद्रांची संख्या ३० वर जाईल, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.