Advertisement

कोरोना संकटात पत्रकारांनाही ५० लाखांचं विमा संरक्षण

कोरोना संकटात पत्रकारांनाही ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळेल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे.

कोरोना संकटात पत्रकारांनाही ५० लाखांचं विमा संरक्षण
SHARES

कोरोना संकटाच्या काळात जीव मुठीत घेऊन अहोरात्र सेवा देणाऱ्या अत्यावश्यक कर्मचाऱ्यांमध्ये आता प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींचाही समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पत्रकारांनाही ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण मिळेल, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना टोपे यांनी ही माहिती दिली.  

मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून या रुग्णांवर उपचार करत आहेत. त्याचजोडील अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि लाॅकडाऊनच्या काळात कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले पोलीस कोरोना योद्धा म्हणून आपलं कर्तव्य बजावत आहेत. त्यामुळे या सर्वांना कोरोना योद्धा असा दर्जा देऊन राज्य सरकारकडून त्यांना ५० लाखांच्या विम्याचं संरक्षण देण्यात आलं आहे. जेणेकरून दुर्दैवाने कर्तव्य बजावत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना आर्थिक आधार मिळू शकेल. 

हेही वाचा - कोरोना योद्ध्यांना ५० लाख रुपयांचं विमा संरक्षण

याच पद्धतीने प्रसार माध्यमातील प्रतिनिधी, पत्रकार देखील स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांपर्यंत माहिती पोहोचवत असताना, त्यांना आतापर्यंत कुठंलही संरक्षण मिळालेलं नव्हतं. तर अनेक पत्रकारांना कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागणी झाली होती. त्यामुळे पत्रकारांनाही विम्याचं संरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात येत होती. या मागणीची दखल घेऊन अखेर राज्य सरकारने सकारात्मक निर्णय घेतला आहे.

यासंदर्भात राजेश टोपे म्हणाले की, केवळ डॉक्टर आणि पोलीसच नाही तर पत्रकारही कोरोना काळात कर्तव्य बजावत आहेत. दुर्देवानं जर कोणी कर्तव्य बजावताना बाधित झालं तर घाबरून जाण्याचं कारण नाही. तुम्ही बरे व्हालच. दुर्देवानं कर्तव्य बजावताना एखाद्या पत्रकाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर त्यालाही ५० लाखांचं विमा कवच असणार आहे. तो केवळ शासकीय कर्मचाऱ्यांपुरता नाही, असं टोपे म्हणाले.

जर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं की हा पत्रकार आहे आणि त्याला कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण झाली. तसंच यात दुर्देवानं त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या कुटुंबियांना या विम्याचा लाभ मिळेल. तसंच कोरोनाचं काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांना ५० लाखांचं हे विमा कवच मिळणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.  

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा