Advertisement

coronavirus updates: एकट्या मुंबईत कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण

कोरोना रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे इथले आहेत. एकट्या मुंबईत कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण आहेत.

coronavirus updates: एकट्या मुंबईत कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण
SHARES

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत, या मागचं कारण म्हणजे राज्यात सर्वाधिक चाचण्यात होत आहेत. राज्यातील कोविड-१९ चाचणी केंद्रांची संख्याही इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक २५ एवढी आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारणं नसलं, तरी काळजी नक्कीच घेतली पाहिजे, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

सर्वाधिक चाचण्या

प्रसारमाध्यमांना राज्यातील सद्यस्थितीविषयक माहिती देताना राजेश टोपे म्हणाले, महाराष्ट्रात आतापर्यंत देशातील सर्वाधिक ३३ हजार कोविड-१९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १६५२ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एकट्या मुंबईत १९ हजार चाचण्या झाल्या आहेत. त्यातील १ हजार जण रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांपैकी ७० टक्के रुग्णांना लक्षणे नसून २५ टक्के रुग्णांना सौम्य स्वरूपाची तर ५ टक्के रुग्णांची स्थिती गंभीर आहे.

हेही वाचा - महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लाॅकडाऊन सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

मुंबई, पुण्यात ९१ टक्के रुग्ण

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर, पुणे इथले आहेत. एकट्या मुंबईत कोरोनाचे ६१ टक्के रुग्ण असून ठाणे, पालघर, नवी मुंबई भागात १० टक्के तर पुणे येथे २० टक्के रुग्ण आढळून आले आहेत. राज्याचा कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ५.५ टक्के आहे. त्यामुळे रुग्ण समोरुन येण्याची वाट न बघता महापालिका आता घरोघरी जाऊन चाचण्या करत आहे. केंद्र सरकारला सांगून आपण आणखी ५ चाचणी केंद्र येत्या २ ते ३ दिवसांत सुरू करत आहोत. यामुळे राज्यातील कोविड-१९ चाचणी केंद्रांची संख्या ३० वर जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

३ प्रकारची रुग्णालये

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार आता कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची वर्गवारी करण्यात आली आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी कोरोना केअर रुग्णालये असून सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी कोरोना हेल्थ तर तीव्र लक्षणे असलेल्यांकरिता कोरोना हॉस्पिटल अशी त्रिस्तरीय वर्गवारी केल्याची माहिती टोपे यांनी दिली. 

कोरोना चाचण्यांबाबत पूल टेस्टिंग ही नवीन संकल्पना महाराष्ट्राने पंतप्रधानांसमोर मांडली. एकाच वेळेस अनेकांची चाचणी घेतल्यास वेळेची आणि किटची बचत होण्यास मदत होईल. तसंच लाॅकडाऊनच्या काळात टेलिमेडिसीनच्या माध्यमातून इतर आजार असलेल्या रुग्णांना तज्ज्ञ डाॅक्टरांद्वारे वैद्यकीय सल्ला देण्याच्या सूचना सर्व जिल्ह्यांना करण्यात आल्या आहेत, असंही राजेश टोपे म्हणाले. 

हेही वाचा- रेशन मिळत नाहीय? या हेल्पलाईनवर आताच तक्रार करा!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा