Advertisement

महाराष्ट्रात पहिल्या दिवशी ६४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण

राज्यातील २८५ केंद्रांवर ६४ टक्के जणांना, तर मुंबईत ५० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस देण्यात आली.

महाराष्ट्रात पहिल्या दिवशी ६४ टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण
SHARES

राज्यात शनिवार १६ जानेवारी २०२१ पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास या मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला. राज्यातील २८५ केंद्रांवर ६४ टक्के जणांना, तर मुंबईत ५० टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस देण्यात आली.  

बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरण सुरू होतं. सुमारे १८ हजार ३३८ हून अधिक (सुमारे ६४ टक्के) कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली. काही ठिकाणी सायंकाळी सातनंतरही लसीकरण सुरू होतं. लसीकरणास कर्मचाऱ्यांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला असून दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं.

जे.जे. रुग्णालयात लसीकरणाचा शुभारंभ

दरम्यान, मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते जे.जे. रुग्णालयातील लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अमीन पटेल, मुंबई शहर जिल्हाधिकारी  राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

राज्यात सकाळी ११ वाजेनंतर लसीकरणाला सुरूवात झाली. ज्या ठिकाणी कोविन ॲपमध्ये तांत्रिक अडचण आली तेथे मॅन्युअल नोंदणीसाठी केंद्र शासनाने परवानगी दिली. बऱ्याच ठिकाणी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लाभार्थ्यांची नोंदणी झाली. एकंदरीतच लस घेण्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह दिसून आल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितलं. केंद्र शासनाशी कोविन ॲप संदर्भात चर्चा झाल्यानंतर लसीकरणाचं पुढील सत्र सोमवारी किंवा मंगळवारी घेतलं जाईल, असंही डॉ. व्यास यांनी सांगितलं.

सायंकाळी ७ वाजेपर्यंत लसीकरणाची आकडेवारी अशी (कंसात लसीकरण झालेले कर्मचारी) : अकोला (२३८), अमरावती (४४०), बुलढाणा (५७५), वाशीम (१६७), यवतमाळ (३०७), औरंगाबाद (६४७), हिंगोली (२००), जालना (२८७), परभणी (३७१), कोल्हापूर (५७०), रत्नागिरी (२७०), सांगली (४५६), सिंधुदूर्ग (१६५), बीड (४५१), लातूर (३७९), नांदेड (२६२), उस्मानाबाद (२१३), मुंबई (६६०), मुंबई उपनगर (१२६६), भंडारा (२६५), चंद्रपूर (३३१), गडचिरोली (२१७), गोंदिया (२१३), नागपूर (७७६), वर्धा (३४४), अहमदनगर (७८६), धुळे (३८९), जळगाव (४४३), नंदुरबार (२६५), नाशिक (७४५), पुणे (१७९५), सातारा (६१४), सोलापूर (९९२), पालघर (२५७), ठाणे (१७४०), रायगड (२६०)

(coronavirus vaccination programme starts in maharashtra)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा