Advertisement

आंबे खाण्यावरून डॉक्टरांमध्येच जुंपली !


SHARES

मधुमेह झालेल्या रुग्णांनी आंबे खावेत की नाही, यावरून सध्या डॉक्टरांमध्येच जुंपल्याचे चित्र मुंबईतील वैद्यकीय क्षेत्रात रंगलेले दिसून येत आहे. याला निमित्त झाले आहे ते प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांनी 'आंबा' या विषयावर सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओचे. दिवेकर यांनी या व्हिडीओत मधुमेह झालेल्या रुग्णांनीही मनसोक्तपणे आंबा खाण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या या सल्ल्यावरून डॉक्टरांमधून परस्परविरोधी मते मांडली जात आहेत.

मधुमेह असलेल्या रुग्णांना गोड खाण्यापासून किती आणि कसा आहार घ्यावा? याबाबतीत कडक पथ्ये पाळावी लागतात. दिवेकर यांच्या व्हिडीओमुळे मधुमेहींना एकप्रकारे आंबा खाण्यासाठी आयते कोलीत मिळाले. दिवेकर यांनी मधुमेही कितीही प्रमाणात आंबे खाऊ शकतात असे आपल्या व्हिडीओत सांगितले आहे. पण, खरेच मधुमेहींनी आंबा खावा का? आणि खाल्लाच तर तो किती प्रमाणात खावा? याबाबत काही मधुमेहींच्या मनात पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


एखादा रुग्ण मधुमेहावर आयुर्वेदिक उपचार घेत असेल, तर त्याने आंबा खाताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही व्यक्ती व्यायाम किंवा अधिक परिश्रम करत असेल, तर त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण नक्कीच कमी होते. त्यानंतर त्याने आंबा खाल्ला तर ती साखर त्याच्या रक्तात मिसळणार नाही. पण, याच रुग्णाने दररोज एक ते दोन आंबे खाल्ल्यास त्याच्या शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकेल. आंबा चोखून खात असाल, तर तो पचायला सोपा असतो आणि फोडी करुन खाल्ला, तर तो पचायला जड असतो. वजन कमी असलेल्यांनी आंबा आवर्जून खाल्ला पाहिजे.
डॉ.परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति

दिवेकर यांच्या सल्ल्यावर मधुमेहतज्ज्ञांनीही आक्षेप नोंदवला आहे. खरेतर आंब्याचे सेवन रुग्णांच्या शरीरातील साखरेच्या प्रमाणावर अवंलबून आहे. एखाद्या व्यक्तीला सुरुवातीच्या टप्प्यात मधुमेह असेल, तर ती व्यक्ती आंबा खाऊ शकते. पण त्यालाही प्रमाण असले पाहिजे. पण एखादी व्यक्ती अनेक वर्षांपासून मधुमेहाने त्रस्त असेल तर त्या व्यक्तीने आंब्यापासून दूरच राहिलेले बरे. आंब्यामध्ये भरपूर प्रमाणात 'ग्लायसेमिक' असते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. म्हणून अतिप्रमाणात आंब्याचे किंवा पपई, चिकू यांसारख्या फळांचे सेवन केल्यास शरीरातील साखरेचे प्रमाण वाढू शकते.

मधुमेहाचा रुग्ण आंबा खाऊ शकतो. पण, त्याचा अतिरेक झाल्यास शरीरातील साखर नक्कीच वाढू शकते. यामुळे पोटातही गडबड होऊ शकते. दिवसातून दोनदा म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी मधुमेह असलेले रुग्ण आंबा खाऊ शकतात.
डॉ.विजय पन्नीकर, मधुमेहतज्ज्ञ

मधुमेहाचा रुग्ण कैरी खाऊ शकतो. पण आंबा खाऊ शकत नाही. पपई, चिकू, आंबा ही गोड फळे आहेत. त्याऐवजी या रुग्णांना मोसंबी, संत्री, सफरचंद ही फळे खाता येतात. आंबा जास्त गोड असल्याने शरीरातील साखर यामुळे नक्कीच वाढू शकते.
डॉ. अमोल घुले, मधुमेहतज्ज्ञ

मधुमेह असलेल्या रुग्णांनी आंबा खाऊच नये. कारण त्यात साखरेचे प्रमाण खूप असते. आठवड्यातून एकदा आंबा खाल्ला, तर त्या दिवशी शरीरात साखर तयार करणारे इतर पदार्थ कमी खावे. जेणेकरुन साखर मर्यादीत राहू शकते.
डॉ. शेलेंद्र होडकर, मधुमेहतज्ज्ञ

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा