Advertisement

हृदयशस्त्रक्रियेत रूग्णांची लूट सुरूच, कॅथेटरद्वारे १४० ते ४०५ टक्क्यांची नफेखोरी

रूग्णांची, रूग्णांच्या नातेवाईकांची डाॅक्टर आणि रूग्णालयांकडून आॅपरेशनच्या नावाखाली आर्थिक लूट होत असते नि याची पुसटशी कल्पनाही रूग्ण, नातेवाईकांना नसते. मात्र हृदयशस्त्रक्रियेच्या नावाखाली रूग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट कशी होतेय याचा पर्दाफाश केला आहे, नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग अॅथाॅरीटी (एनपीपीए) ने.

हृदयशस्त्रक्रियेत रूग्णांची लूट सुरूच, कॅथेटरद्वारे १४० ते ४०५ टक्क्यांची नफेखोरी
SHARES

तुमच्या रूग्णाला हृदयाचा गंभीर आजार आहे, त्यामुळे त्याचं त्वरीत आॅपरेशन करावं लागणार आहे, असं सांगताच रूग्णांच्या नातेवाईकांचे हातपाय गळायला लागतात. हे कमी की काय तोच डाॅक्टर आॅपरेशनचा खर्चही सांगतात. हा खर्च ऐकून नातेवाईकांच्या हृदयाचे ठोके वाढतात. कारण डाॅक्टरांनी सांगितलेली ही रक्कम लाखांच्या घरात असते. पण, आॅपरेशन करणं महत्त्वाचं असल्यानं कशीबशी रक्कम जमवत आॅपरेशन करून घेण्याकडेच नातेवाईकांचा कल असतो. प्रत्यक्षात मात्र रूग्णांची, रूग्णांच्या नातेवाईकांची डाॅक्टर आणि रूग्णालयांकडून आॅपरेशनच्या नावाखाली आर्थिक लूट होत असते नि याची पुसटशी कल्पनाही रूग्ण, नातेवाईकांना नसते.

मात्र हृदयशस्त्रक्रियेच्या नावाखाली रूग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट कशी होतेय याचा पर्दाफाश केला आहे, नॅशनल फार्मासिट्युकल प्रायझिंग अॅथाॅरीटी (एनपीपीए) ने. १२ फेब्रुवारीला 'एनपीपी'ने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार मुंबईसह देशभरातील रूग्णालय-डाॅक्टरांकडून हृदयशस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या 'कॅथेटर'च्या आर्थिक लुटीची आकेडवारीच 'एनपीपी'ने प्रसिद्ध केली आहे. 'कॅथेटर'च्या नावाखाली १४० ते ४०५ टक्क्यांपर्यंतची नफेखोरी होत असल्याचं या आकेडवारीतून उघड झालं आहे.


बंद झालेली दुकानं पुन्हा सुरू

अँजिओप्लास्टीसाठी वापरण्यात येणारं स्टेण्ट २५ ते ३० हजारांत उपलब्ध होत असताना प्रत्यक्षात मात्र स्टेण्ट ७५ हजार ते अडीच लाखांत उपलब्ध करून दिलं जात होतं. ही बाब लक्षात आल्यानंतर गेल्या वर्षी 'एनपीपीए'ने स्टेण्टच्या किंमती नियंत्रित करत ३० हजारांत स्टेण्ट उपलब्ध करून दिले. स्टेण्टच्या किंमतीवर नियंत्रण आल्यानं रूग्णालय-डाॅक्टरांची बंद झालेली दुकानं पुन्हा सुरू झाली आहेत, ती या 'कॅथेटर'च्या नफेखोरीतून. विविध प्रकारच्या 'कॅथेटर'च्या मूळ किंमतीच्या १४० ते ४०५ टक्क्यांपर्यंत अधिक किमतीत विकली जात असल्याचं 'एनपीपीए'च्या पत्रातून उघड झालं आहे.


'असा' कमावतात नफा

'एनपीपीए'च्या पत्रानुसार 'कार्डिअॅक बलून कॅथेटर'ची विक्री मूळ किंमतीपेक्षा ४०५ टक्क्यांनी डाॅक्टर-रूग्णालयांकडून केली जात आहे. तर वितरक-कंपन्या २३४ टक्क्यांचा नफा यातून कमावत आहेत. 'कार्डिअॅक गाईड वायर'च्या विक्रीतून डाॅक्टर-रूग्णालय १५८ टक्क्यांंची, तर वितरक-कंपन्या ११२ टक्क्यांची नफेखोरी कमावत आहेत. तर 'कार्डिअॅक गायडींग कॅथेटर'च्या माध्यमातून रूग्णालय-डाॅक्टर २९५ टक्क्यांची तर वितरक-कंपन्या ९३ टक्क्यांची नफेखोरी कमावत आहेत.

'कार्डिअॅक ड्रग एलुटींग बलून'च्या विक्रीतून डाॅक्टर-रूग्णालय २९२ टक्के अधिक रक्कम रूग्णांकडून उकळत आहेत. तर याच बलूनच्या विक्रीतून वितरक-कंपन्या १४० टक्के नफा कमावताना दिसताहेत. 'कार्डिअॅक गायडींग कॅथेटर'-स्पेशल फिचरच्या माध्यमातून रूग्णालय-डाॅक्टर १७२ टक्के, तर वितरक, कंपन्या १४० टक्के नफा कमावत आहेत.


लुटीवर नियंत्रणाची गरज

ही आकडेवारी धक्कादायक असून आता या नफेखोरीला आणि रूग्णांच्या आर्थिक लुटीवर नियंत्रण आणण्याची गरज व्यक्त होत आहे. दरम्यान 'एनपीपीए'नंही याची गंभीर दखल घेतली असून १५ मार्च २०१८ पर्यंत यासंबंधीच्या सुचना-हरकती नोंदवण्याचं आवाहन जनतेला केलं आहे.

त्यानुसार सुचना-हरकतींचा अभ्यास केल्यानंतर 'एनपीपीए'कडून कॅथेटरच्या किंमती नियंत्रित होण्याची शक्यता आहे. असं झाल्यास नक्कीच कॅथेटरच्या नावाखाली होणारी आर्थिक लूट थांबेल आणि रूग्णांना दिलासा मिळेल, अशी आशा या निमित्तानं वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.



हेही वाचा-

हृदयरोग्यांना व्हॅलेन्टाईन गिफ्ट, स्टेण्ट झालं स्वस्त



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा