Advertisement

Coronavirus Updates : निवासी डॉक्टरांना करोनाप्रतिबंधक किट आणि मास्क उपलब्ध नसल्याबद्दल चिंता

निवासी डॉक्टरांच्या जिवाला धोका असल्याची भीती निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं व्यक्त केली आहे.

Coronavirus Updates : निवासी डॉक्टरांना करोनाप्रतिबंधक किट आणि मास्क उपलब्ध नसल्याबद्दल चिंता
SHARES

कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळं रुग्णांच्या संख्येत झपाड्यानं वाढ होतं आहे. या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी देशभरातील डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत आहेत. रुग्णांना योग्यवेळी उपचार देत असून, त्यांना सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं जात आहे. दरम्यान, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये करोना तपासणी केंद्रांसह तापासाठीची ओपीडीही सुरू करण्यात आली. या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेले अनेक निवासी डॉक्टर अहोरात्र काम करत आहेत. मात्र, या डॉक्टरांना करोनाप्रतिबंधक पोशाख आणि मास्क अद्याप देण्यात आले नसून, ते केवळ करोना केंद्रांतील रुग्णांची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांना देण्यात आले आहेत. त्यामुळं निवासी डॉक्टरांच्या जिवाला धोका असल्याची भीती निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं व्यक्त केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याप्रकरणी 'मार्ड'नं पत्र लिहिलं आहे. निवासी डॉक्टरांना करोनाप्रतिबंधक किट आणि मास्क उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. वैद्यकीय उपचार करणारे डॉक्टर आणि निवासी डॉक्टरांसोबत काम करणारे वैद्यकीय कर्मचारी तसंच सफाई कर्मचारी यांच्याही जीवाला यामुळं धोका निर्माण होऊ शकतो, असं 'मार्ड'चे म्हणणं आहे. रुग्णालयात पोषक आहाराची समस्याही असल्याचंही निवासी डॉक्टरांनी निदर्शनास आणून दिलं आहे.

डॉक्टरांना एक मास्क ३-४ दिवस वापरावा लागतो आहे. त्याशिवाय, जे डॉक्टर कस्तुरबा तसंच, विमानतळावरही काम करतात त्यांचीही व्यवस्थित वैद्यकीय तपासणी होऊन त्यांना संसर्ग नसल्याची खातरजमा केली जावी, अशी मागणीही 'मार्ड'नं केली आहे. आत्तापर्यंत ५ डॉक्टरांना करोनाची लागण झाल्याचा संशय असल्याची माहिती केंद्रीय मार्ड कडून देण्यात आली असून, त्या डॉक्टरांचे अहवाल बुधवारी येणार आहेत.

अनेक सर्वसामान्यांनी रविवारी जनता कर्फ्यूच्या दिवशी रुग्णालयातील मेसमध्ये गर्दी केली. त्यामुळं मेसमध्ये शिधाही उरलेला नाही. जेवण कुणालाही नाकारण्यात आले नाही. मात्र, संसर्गजन्य आजारांसाठी उपचार देणाऱ्या डॉक्टरांनाही पोषक आहाराची गरज आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी फळं, धान्य, सुकामेवा अशा प्रकारची मदत करू इच्छिणाऱ्या सामाजिक संघटनांनी पुढे यावं, असं आवाहन डॉक्टरांकडून करण्यात आलं आहे.



हेही वाचा -

Coronavirus Updates : जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला बाजाराच्या वेळा ठरवून द्या - भाकप

Coronavirus Updates : आता १४ एप्रिलपर्यंत देशातील प्रवासी रेल्वेसेवा बंद



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा