Advertisement

साथीरोग नियंत्रण कक्षासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू


साथीरोग नियंत्रण कक्षासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू
SHARES

पावसाळ्यात साथीच्या रोगांचं प्रमाण वाढतं असतं. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेने आतापासूनच तयारी सुरू करावी. आरोग्य विभागाने निम्न शहरी भागात विशेष लक्ष द्यावं, असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केलं आहे. आधीपासूनच साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी येत्या १५ मे पासून साथरोग नियंत्रण कक्ष सुरू करण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी महाराष्ट्र साथीरोग नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत डॉ. दीपक सावंत यांनी पावसाळ्यात होणाऱ्या साथीच्या रोगावर नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना त्या दृष्टीने पावलं उचलण्याचे निर्देश दिले.


डॉ. सावंत यांच्या सांगण्यानुसार,

'सर्व आरोग्य यंत्रणांनी समन्वय राखल्यामुळे गेल्या तीन वर्षांत साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. यापुढे स्वाईन फ्ल्यू, लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, माकडताप, चिकनगुनिया या साथीच्या रोगांवर नियंत्रणासाठी राज्याचा आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सतर्क रहावं.

ग्रामीण आणि शहरी भागाबरोबरच निम्न शहरी भागावर देखील प्राधान्याने लक्ष द्यावं. साथीचे रोग पसरणाऱ्या ठिकाणांवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवावं. शिवाय, राज्यातील प्रत्येक आरोग्य मंडळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या ठिकाणी स्वाईन फ्ल्यू प्रयोग शाळा स्थापन करावी. नाशिकमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी ही प्रयोगशाळा तातडीने उभारावी. साथीच्या रोगासंबंधी घ्यायची काळजी, निदान याविषयी जनजागृती करावी', अशा अनेक सूचनाही डॉ. दीपक सावंत यांनी दिल्या आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा