Advertisement

म्युकरमायकोसिसची मोफत चाचणी, उपचाराची नवी मुंबई पालिकेकडून सुविधा

महापालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालयात म्युकरमायकोसिस बाबत तपासणी करण्याकरिता बाह्यरुग्ण सुविधा (OPD) कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत.

म्युकरमायकोसिसची मोफत चाचणी, उपचाराची नवी मुंबई पालिकेकडून सुविधा
SHARES

 मागील काही दिवसांपासून म्युकरमायकोसिस अर्थात काळी बुरशीच्या रूपाने एक नवीनच संकट उभं राहिलं आहे. नवी मुंबई महापालिकेने म्युकरमायकोसिसचा प्रभाव रोखण्यासाठी रूग्णशोध, तपासणी आणि उपचार अशा प्रकारची यंत्रणा सज्ज केली असल्याची माहिती देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. म्युकरमायकोसिस रूग्णशोधासह मोफत तपासणी, चाचण्या व उपचाराची  सुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे. 

अभिजीत बांगर यांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिपव्दारे नागरिकांशी संवाद साधत 'घाबरू नका पण दक्षता घ्या' असं आवाहन करीत महानगरपालिका आपल्या सोबत आहे असा विश्वास दिला आहे.

म्युकरमायकोसिसशी संबंधित चर्चा सुरू झाल्याबरोबर त्याच दिवशी आयुक्तांनी तातडीने नवी मुंबई सिटी टास्क फोर्स आणि म्युकरमायकोसिसशी संबंधित उपचार करणा-या नवी मुंबईमधील रूग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांशी वेबसंवादाव्दारे सविस्तर चर्चा केली. महापालिकेचा म्युकरमायकोसिस संबंधित कृती आराखडा तयार करून त्वरित अंमलबजावणीला सुरूवात करण्यात आली आहे.

महापालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली येथील तिन्ही सार्वजनिक रुग्णालयात म्युकरमायकोसिस बाबत तपासणी करण्याकरिता बाह्यरुग्ण सुविधा (OPD) कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. याठिकाणी गरज भासल्यास डायग्नोस्टिक टेस्ट्सची व्यवस्था करण्यात आली. त्यासोबतच पालिकेच्या वाशी सार्वजनिक रूग्णालयात म्युकरमायकोसिस वरील रूग्णांवर उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 एखाद्या रूग्णाला शस्त्रक्रियेची गरज भासली तर ही शस्त्रक्रिया गुंतागुतीची असल्याने शहरातील नामांकीत सर्जनचे एक पॅनल बनविण्यात आले असून आवश्यकतेनुसार त्यांच्या सेवा उपलब्ध करून घेतल्या जाणार आहेत. म्युकरमायकोसिस बाबत तिन्ही महापालिका रूग्णालयाच्या ओपीडी मधील तपासणी, टेस्ट्स तसेच वाशी रूग्णालयातील उपचार विनामूल्य केले जातील असंही आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितलं आहे. 

नागरिकांच्या मनात म्युकरमायकोसिसचे औषध उपलब्धतेबाबत तसेच ते महाग असल्याने खर्चाबाबत चिंता आहे. नवी मुंबई महानगरपालिका शहरातील रूग्णांना प्राधान्याने औषध कसे उपलब्ध होईल याबाबत महापालिका दक्ष असून ज्यांना परवडत नाही त्यांना औषध मोफत उपलब्ध करून दिले जाईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे.    



हेही वाचा - 

आता होम आयसोलेशन बंद, कोविड सेंटरमध्येच व्हावं लागणार भरती

COVID 19 रुग्ण शोधण्यासाठी कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं, अभ्यासातून उघड

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा