Advertisement

महामार्गावर अपघातग्रस्तांना मिळणार तात्काळ प्रथमोपचार


महामार्गावर अपघातग्रस्तांना मिळणार तात्काळ प्रथमोपचार
SHARES

राज्यभरातील महामार्गावर अनेकदा अपघात होत असतात. या अपघातात काही लोकांना आपला जीव गमवावा लागतो तर काही जण गंभीर जखमी होतात. मात्र जखमी अवस्थेतील प्रवाशी यांचा ही तातडीनं उपचार न मिळाल्यानं अनेकदा मृत्यू होतो. त्यामुळं राज्यातील महामार्गांवर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ प्रथमोपचार देण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून एक वेगळी संकल्पना राबविण्यात येणार आहे. महामार्गांलगतच्या गावातील ग्रामस्थ, पेट्रोल पंप आणि ढाब्यावर काम करणारे कर्मचारी आदींना प्रथमोपचार प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

येत्या १८ जानेवारीपासून होणाऱ्या रस्ते सुरक्षा अभियानात या प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे. बेदरकारपणे किंवा मद्य पिऊन वाहन चालवणे, ओव्हरटेक करणे, विरुद्ध दिशेने वाहन चालवणे इत्यादी कारणांमुळे दरवर्षी महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. यामध्ये अनेकांचे जीव जातात किंवा अनेक जण गंभीर जखमी होतात. अशा अपघातग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी, यासाठी राज्य शासनाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही उपलब्ध केली आहे.

मात्र, वाहतूक कोंडी किंवा अन्य कारणांमुळे रुग्णवाहिका पोहोचण्यास विलंब झाल्यास एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे अपघातग्रस्तांना त्वरित प्रथमोपचार मिळून त्यांचे प्राण वाचवण्यासाठी महामार्ग पोलिसांनी गावकरी, पेट्रोल पंप, पथकर नाके  व ढाब्यावरील कर्मचारी, दुकानदार यांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अपघातातील जखमी व्यक्तीचा रक्तस्रााव कसा थांबवावा, एखाद्या वाहनचालकाला हृदयविकाराचा झटका आल्यानंतर काय करावे, अशा प्रकारचे प्रशिक्षण महामार्गांलगत असलेल्या गावकरी, स्थानिकांना देण्यात येणार आहे. गाव, तालुका येथे असलेल्या दवाखान्यांमधील किंवा सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टरांची प्रशिक्षण देण्यासाठी मदत घेतली जाणार आहे.

स्ट्रेचर, वैद्यकीय सुविधांसह प्रथमोपचार पेटीही पेट्रोल पंप, पथकरनाक्यांवर उपलब्ध करता येऊ शकते याचाही विचार केला जात आहे. सध्या राज्यात ६३ ठिकाणी महामार्ग पोलिसांचे मदत केंद्र असून या केंद्रावरील कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा