मुंबईत लेप्टोचे रुग्ण घटले, महापालिकेच्या आरोग्य विभागाचा अहवाल


SHARE

मुंबईत 29 ऑगस्ट 2017 ला झालेल्या मुसळधार पावसाची तुलना अनेकांनी 26 जुलै 2005 ला पडलेल्या पावसाशी केली. यामुळे, मुंबई महापालिकेला टीकेला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर महापालिकेनं झपाटून केलेल्या कामाचा अहवाल देत लेप्टोस्पोयरोसीसच्या रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा केला आहे.

26 जुलै 2005 च्या पावसानंतर मुंबईत लेप्टोचे 1 हजार 446 रुग्ण आढळून आले होते, तर 119 रुग्णांचा मृत्यू झाला होता. पण, 29 ऑगस्ट 2017 च्या अतिवृष्टीनंतर जनजागृतीसाठी प्रतिबंधात्मक आरोग्य मोहीम राबविली. शिवाय, मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिरे आयोजित करून प्रतिबंधात्मक गोळ्यांचंही वाटप करण्यात आलं.

या सर्व मोहिमेला नागरिकांनी सगजपणे प्रतिसाद दिल्यामुळे ही मोहीम प्रभावी ठरल्याचा दावा महापालिकेच्या कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी केला आहे. या वर्षी 30 सप्टेंबरपर्यंत लेप्टोचे 212 रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

29 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसात बऱ्याच ठिकाणी पाणी भरलं. त्यामुळे, नागरिकांना पावसाच्या पाण्यामधून चालावं लागलं. पावसाच्या पाण्याशी संबंध आलेल्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसीस होण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपचारांबाबतची माहिती आरोग्य खात्याने 'एसएमएस'द्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवली. तसंच 173 आरोग्य शिबिरे, 20 लाख 86 हजार 307 घरांपर्यंत पोहोचणे आणि 93 लाख 56 हजार 694 लोकांचे प्रतिबंधात्मक सर्वेक्षण करण्यात आलं. तसंच, 4 लाख 64 हजार 854 डॉक्सीसायक्लीन या गोळ्यांचं वाटप करण्यात आलं.


लेप्टोस्पायरोसीसची लक्षणं  

ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्राव, श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड आणि यकृत निकामी होऊन योग्य वेळी औषधोपचार न मिळाल्यास मृत्यू  


ही काळजी घ्याल?  

  • पावसाळ्यात येणारा ताप डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसीस असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष नको
  • डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे आवश्यक 
  • पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळा, गमबुटाचा वापर करावा 
  • साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे करावे
  • साचलेल्या पाण्यातून चालल्यामुळे लेप्टोस्पायरोसिस संसर्ग होण्याची शक्यता  
  • उंदीर-घुशींचा नायनाट करावा डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय